महाराष्ट्रातील जमिनी वेगवेगळ्या खडकांपासून तयार झाल्या असून त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत. मुख्यत: बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या काळ्या जमिनांना रेगूर म्हणतात. या उथळ ते भारी खोल असतात. समुद्रपाटीपासून ३०० ते ९०० मीटर उंच पठारावर उष्ण व कोरडय़ा भागात त्या आढळतात. उतारावरील जमिनी हलक्या लालसर व कमी सुपीक असतात. नदीकाठच्या भागात त्या खोल भारी काळ्या रंगाच्या असतात. भारी खोल जमिनीत चिकणमाती जास्त असते. पाणी धारणशक्ती चांगली असते. परंतु पाण्याचा निचरा कमी होतो. या जमिनी नत्रखतास उत्तम प्रतिसाद देतात. जमिनीतील थरात मोठय़ा प्रमाणात चुनखडी सापडते.
कृष्णा-गोदावरी नद्यांच्या खोऱ्यातील काळ्या जमिनी फारच सुपीक आहेत. जमिनीचा काळा रंग हा सेंद्रीय पदार्थाचे विघटन भाग व चिकणमातीचे मिश्रण तसेच टिटॅनियम ऑक्साईडमुळे होतो. काळी माती वाळल्याने तिला भेगा पडतात. अशा प्रकारे नांगरणीचे काम नसíगकरीत्या होते. म्हणून त्यास रेगूर (स्वयंनांगरट) जमिनी म्हणतात. काळ्या जमिनीत कापूस पीक घेत असल्याने त्यांना काळ्या कापसाच्या जमिनी असेही म्हणतात. खोलीनुसार या जमिनी उथळ, मध्यम वा खोल असतात.
उथळ जमिनीची खोली २२.५ सेमीपर्यंत असून त्यांची सुपीकता व उत्पादकता कमी असते. पाऊस चांगला झाल्यास पिकांचे उत्पादनही चांगले येते.
मध्यम खोल काळ्या जमिनीची खोली ६० ते ९० सेमीपर्यंत असते. यात चिकणमाती बऱ्यापकी असते. नत्र व स्फुरद कमी परंतु कॅल्शियम व पालाश भरपूर असते. सुपीक असल्याने यामध्ये खरीप तसेच रब्बी पिके चांगली येतात.
भारी खोल जमिनीची खोली ९० सेमीपेक्षा जास्त असून काही ठिकाणी ती तीन ते सहा मीटपर्यंत असते. या जमिनीत चिकणमाती जास्त असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम भरपूर असते. परंतु नत्र व स्फुरद कमी असते. या जमिनीची पाणीधारणशक्ती जास्त असल्याने त्यात रब्बी हंगामाची जिरायती पिके घेतात. या जमिनीचा निचरा चांगला नसतो. म्हणून या बागायतीस योग्य नसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा