यास्मिन शेख
‘या कादंबरीचे त्या टीकाकाराने जे परीक्षण केले आहे, तिच्यात बऱ्याच त्रुटी आढळतात.’
या वाक्यात एक चूक आहे, ती म्हणजे ‘तिच्यात’ या शब्दाची सदोष योजना. ‘तिच्यात’ या सार्वनामिक शब्दातील मूळ सर्वनाम आहे- ‘ती’ (स्त्रीलिंगी एकवचनी). ‘ती’ या शब्दाला प्रत्यय वा शब्दयोग लागून शब्द होतील तीत, तिच्या, तिच्यात, तिच्यामध्ये इ. वरील वाक्यात ‘तिच्यात’ हा शब्द ‘परीक्षण’ या शब्दासाठी योजलेला आहे. ‘परीक्षण’ हे नाम नपुंसकिलगी, एकवचनी आहे; ‘तिच्यात’ हा शब्द ‘कादंबरी’ या स्त्रीलिंगी एकवचनी नामासाठी नाही. त्रुटी आहेत त्या परीक्षणात; कादंबरीत त्रुटी नाहीत, पण फारसा विचार न करता कित्येक मराठी भाषक अशी चूक करतात. चूक लक्षात आली, तरी ऐकणारा त्या वाक्यातील अर्थ समजून घेतो; पण नेमकी सदोष वाक्यरचना कोणती, ती दुरुस्त करणे आपले कर्तव्य आहे, असा विचार सहसा कोणी करत नाही! आणि समजा, ती चूक बोलणाऱ्याच्या वा लिहिणाऱ्याच्या निदर्शनास एखाद्याने आणली तर तो काय म्हणणार? ‘चालायचंच!’ ती चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे, असे त्याला वाटत नाही. आपणच आपल्या भाषेवर अन्याय करत आहोत, याची जाणीवच अनेकांना नसते.
या संदर्भात माझा एक अनुभव येथे नोंदवावासा वाटतो. एक प्रतिष्ठित सद्गृहस्थ ‘मला तुमचं मत पायजेल’ असे म्हणाले. ‘पाहिजे’ ऐवजी ‘पायजेल’ असा चुकीचा प्रयोग ते अनेकदा करायचे. एका मराठी भाषाप्रेमीने ही चूक अत्यंत सौम्यपणे, त्यांचा अनादर न करता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या सद्गृहस्थांनी काय उत्तर द्यावे? ‘अहो, कळतंय ना मी काय म्हणतोय ते? मग झालं तर’ चूक दाखवणारा यावर काय बोलणार? आता काही शाब्दिक चुका पाहू. येरझाऱ्या-चूक, येरझारा-बरोबर (मूळ शब्द आहे येरझार- स्त्रीिलगी एकवचनी) या शब्दाचा अर्थ आहे-खेप. त्यामुळे ‘येरझार’ चे अनेकवचन येरझारा होईल (येरझाऱ्या नव्हे.) आणखी एक शब्द अनेकदा चुकीचाच बोलला व लिहिला जातो. तो शब्द आहे- देदीप्यमान-हा बरोबर शब्द आहे. दैदीप्यमान किंवा दैदिप्यमान – हे दोन शब्द चुकीचे आहेत.