ऑस्ट्रेलियातील स्टायलो व सिरॅटो या गवतांचा अभ्यास करून जयंतराव पाटील यांनी ती पिके ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे लावली व त्या हवामानात ती यशस्वी करून दाखवली. या पिकांचा चारा गुरांना दिल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली. हे पाहून कृषीतज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ही पिके भारतभर लावावीत, असा सल्ला दिला. अॅस्परॅगस (शतावरी)ची एक मौल्यवान अमेरिकन भारतात आणून जयंतरावांनी ते इथल्या हवामानातही वाढवले.१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे जन्मलेले डॉ. जयंत शामराव पाटील यांचे शिक्षण बोर्डी, पुणे व कॅन्सास विद्यापीठ येथे झाले. नंतर ते कोसबाडच्या कृषी संस्थेत काम करू लागून तेथे ३४ वष्रे राहिले.कोसबाडला त्यांनी जलसंधारणासाठी पृष्ठभाग विहीर, हिरवळ खते, तीन पिकांचे चक्र, सकस चाऱ्याची पिके, फलोत्पादन, आहार बगीचे आणि कृषी वनीकरण या वनवासींना उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार केला. यामुळे वनवासींना अन्नसुरक्षा मिळाली. वनवासींच्या जमिनीवर उत्पादक रोजगार निर्माण झाल्यामुळे त्यांची गरिबी कमी झाली. हे करत असताना पर्यावरणाचा समतोल त्यांनी टिकवून धरला. त्यामुळे वनवासींचा शाश्वत विकास होऊ शकला. भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषदेने शेतकरी व मच्छिमार यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी कोसबाडला एक केंद्र स्थापन केले व त्याचे डॉ. जयंतराव पाटील पहिले संचालक झाले. या केंद्रात वनवासी शेतकऱ्यांना धान्यपिके, भाजीपाला लागवड, फलोत्पादन, जनावरांचे संगोपन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व मत्स्यपालन याविषयी कौशल्य शिक्षण दिले जाते. जयंतरावांच्या कारकीर्दीत आदिवासींनी शेती उत्पादन, वाढवले, रोपवाटिका तयार केल्या, फळप्रक्रिया उद्योग सुरू केले व ती परंपरा आजही चालू आहे. १९८१ साली महाराष्ट्र शासनाने फलोत्पादन विभाग सुरू केला व ते त्याचे पहिले सल्लागार झाले. त्या काळात महाराष्ट्रात फलोत्पादनाचे प्रमाण बरेच वाढले. रेशीम व अन्नप्रक्रिया उद्योगासही त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून चालना दिली. १९९१ साली ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य झाले. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी, ग्रामविकास, जलसिंचन, पंचायती राज, सहकार व ग्रामीण ऊर्जा या विषयांची जबाबदारी होती. पालघर तालुक्यातील अस्वली धरणाला त्यांनी चालना दिली. आयुष्यभरात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा