शेतात काम करणाऱ्या माणसांचा निरनिराळ्या प्राण्यांशी संपर्क येतो. अशा प्राण्यांच्या ज्ञासावाटे काही जिवाणू, विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याचा संसर्ग माणसाला होतो. उदा. डुक्करांमुळे क्यू हा रोग होऊ शकतो. हा रोग शेतात काम करणाऱ्यांना, कत्तलखान्यात काम करणाऱ्यांना व प्राण्यांच्या डॉक्टरांना होऊ शकतो. यामुळे फुफ्फुस, हृदय तसेच यकृताचा रोग होऊ शकतो. मेंढय़ा, शेळ्या यांच्यापासूनही हा रोग होऊ शकतो.
पोपट व त्यासारखे पाळीव पक्ष्यांपासून विषाणुजन्य रोग होतो. माणसाच्या ज्ञासावाटे हे विषाणू शरीरात शिरतात. ताप येतो. खोकला होतो. डोके खूप दुखते. पोट फुगते. शौचास पातळ होते. याचा लागणकाळ ७ ते १४ दिवस असतो व साधारणपणे दोन-तीन आठवडे हा आजार टिकतो. कोंबडय़ा पाळणाऱ्यांतही हा आजार होतो. या प्राण्यांना हाताळताना तोंडावर फडके बांधावे व त्यांना हाताळल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
एन्थ्रॅक्स हा रोग घोडे, उंट, शेळ्या, बकऱ्या, म्हशी, डुक्करे, गायी वगरे प्राण्यांपासून माणसाला होतो. एन्थ्रॅक्स झालेल्या प्राण्यास तो मेल्याबरोबर पुरला तर रोग पसरत नाही. कारण त्याच्यातील जिवाणू त्याच्या शरीरात सात दिवसांत मरतात. एन्थ्रॅक्स झालेला प्राणी जर अगोदर कापला असेल तर त्याच्या रक्तातील जिवाणू अतिसूक्ष्मरूपात हवेत जाऊन सगळीकडे पसरतात. एन्थ्रॅक्समध्ये ताप, डोकेदुखी होते, खोकला येतो, छातीत दुखते. पिसू, गोचिड हे बीजाणुवाहक प्राण्यांच्या अंगावरील त्वचेत असतात. मेंढय़ाच्या लोकरीतही हे वाहक असतात. त्यामुळे लोकर कापून गठ्ठे करणाऱ्यांतही हा रोग आढळतो.
शेतातील उंदरांपासून लेप्टोस्पायरोसिस रोग होतो. याचे जिवाणू उंदरांच्या मूत्रिपडात आढळतात. लघवीवाटे बाहेर पडल्यावर माणसाच्या शरीरात पायाला पडलेल्या भेगेवाटे शिरतात. यामुळे ताप, अंग दुखणे, कावीळ हे आजार होतात. विशेषत: पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्यातून जाताना हे जिवाणू शिरण्याची शक्यता जास्त असते. कारण पाण्यामुळे पायाची त्वचा -विशेषत: दोन बोटांमधील- मऊ होते. लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू त्यातून शरीरात शिरू शकतात. पायात गमबूट घातल्यास हे जिवाणू शरीरात शिरू शकत नाहीत.
डॉ. शशिकांत प्रधान, मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – म्हातारपण
ज्ञानेश्वरांनी जवळजवळ सगळ्या गोष्टीत लक्ष घातले आहे. तेराव्या अध्यायातल्या जरा/ व्याधि: ह्या दोन शब्दांवर त्यांनी गोळाबेरीज ५० ओव्या सांगितल्या आहेत. त्यातल्या काही माझ्या ओबडधोबड भाषेत उतरवतो.
भर तारुण्यात बघतो। येणार म्हातारपण। तारुण्याचे लुसलशीतपण। होईल काचऱ्यासारखे भीषण।। करंटय़ाचा धंदा। बसतो जसा। तशी समर्थ शरीराला। येईल अवकळा ।। जी मस्तके। हुंगतात फुले। ती होतील। उंटाचे गुडघे।।
तरुणाइतले डोळे। जणु असतात कमळे। पण म्हातारपण येता। होतील पिकलेली पडवळे।। ओठ रंगले विडय़ाने। बोलताना सुंदर दात दिसले। तिथेच पुढे। लाळेचे लोंढे।। वाणीचे सामथ्र्य गेले। कानाला बहिरेपण आले। म्हातारी होतात शरीरे। जणु माकडे ॥ गवताचे बुजगावणे। झोकांडवते वारे। तसे उभ्या शरीराला कापरे ।। पाय होतात फेंगडे। हात वळतात वाकडे तिकडे। तारुण्याचे रूप। होते सोंगासारखे।।
मलमूत्राची घरे। होतात गळकी। नवस करतात शेजारी। म्हातारा मरतो कधी।।
मला लागणाऱ्या ढासेने। लोकांना होतील जागरणे।
असे घडेल। सर्वाना शीण देणे।।
असे विचार केले तारुण्यात। वार्धक्याच्या स्वरूपाची जाण।
अशा तऱ्हेने। यावे वैराग्य।।
म्हणून बहिरा होण्याआधी। सगळे चांगले ऐकून ठेवतो।
पाय पांगळे होण्याआधी। तीर्थाना जातो।।
दृष्टी आहे शाबूत। तोवर बघण्याजोगे पाहतो।
मुका होण्यापूर्वी। सद्वचनाने संतोषतो।।
हात होतील लुळे। हे समजून चालतो।
दयाधर्म इत्यादी। आधीच करून टाकतो।।
मन होईल भ्रांत। हे तो उमगतो।
आणि तत्त्वाचे विचार। आधीच करून ठेवतो।।
चोर लुटतील उद्या। म्हणून संपत्तीची विरक्त विल्हेवाट।
अंधार पडण्यापूर्वी। अन्नाची झाकपाक।।
पुढे करतील जर्जर। नाना प्रकारचे रोग। त्या आधीच आरोग्य। सांभाळतो।।
ज्या ज्या बाजूने। दोष खुपसतील तोंडे। त्या छिद्रांमधे। घालतो निग्रहाचे गुंडे।।
या ओव्या मी चाळिशीत होतो तेव्हा पहिल्यांदा वाचल्या होत्या, मग अनेक वेळा वाचल्या आहेत, पण आज मात्र आरशासमोर उभा राहिलो आणि स्वत:ला न्याहाळू लागलो. मी एकाही तीर्थाला गेलेलो नाही. पण एकाच ठिकाणी बसून विश्वाचा फेरफटका होऊ शकेल ह्य़ा अर्थाच्या ओवीच्या आधारे मी ज्ञानेश्वरी नावाच्या तीर्थाला जवळजवळ दररोजच भेट दिली हे नक्की. म्हातारणपण सांभाळण्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – हृदयरोग व व्यायाम
ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने साडेतीन लाख हृदयरोग्यांचे सर्वेक्षण केले. सहभागी रुग्णांना औषधामुळे, व्यायामामुळे किती फायदा झाला याचा अभ्यास करण्यात आला. हृदयरोगतज्ज्ञांनी रुग्णांचा उपचार करताना व्यायामाचा वापरही औषधाप्रमाणे करावा, असे संशोधकांना वाटते. याचा अर्थ औषधे बंद करून केवळ व्यायाम करणे असे नसल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या दोन्हींचा आरोग्यासाठी लाभदायी वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रुग्णांमध्ये औषध घेण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१० च्या आकडेवारीनुसार प्रत्येक रुग्ण सरासरी १७ औषधांचे सेवन करतो. २००० मध्ये हा आकडा ११ औषधे इतका होता. हृदयरोगामध्ये औषधांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे डॉक्टर औषधे घेण्याचा सल्ला देतातच. तरीही धोका दिवसेंदिवस वाढत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करावी. व्यायामाबद्दलही सल्ला घ्यावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
चांगल्या आरोग्याकरिता आहार नियंत्रण, पुरेसा व्यायाम, वेळेवर झोप या तीन घटकांकडे आपले नेहमीचे चिकित्सक नेहमीच लक्ष वेधत असतात. वर सांगितलेला व्यायामाचा काल हा खूप थंड हवामानातल्या मंडळींना लागू आहे. भारत हा प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील देश आहे. तुम्ही आम्ही रोज दोन अडीच तास व्यायाम करण्याची, सामान्य माणसाकरिता गरज नाही. ज्यांना विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवायचे आहे त्यांनी जरूर भरपूर व्यायाम करावा. हृदयरोगी मंडळींनी नेमका, माफक व्यायाम करावा. सूर्यनमस्कार हा आदर्श सुलभ, कमी वेळात पुरेशी ऊर्जा, उत्साह देणारा व्यायाम आहे. हृदयरोगी मंडळींनी कसलीही धास्ती न बाळगता किमान सहा सूर्यनमस्कार सावकाश घालावे. दीर्घश्वसन, प्राणायाम सगळेच जण करतात. दिवसेंदिवस सकाळ- सायंकाळ फिरायला जाणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. फुफ्फुस, हृदयावर ताण न येता थोडे बागकाम, हलके फुलके खेळ, याबरोबरच शवासन हार्ट पेशंटना एक वरदान आहे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – २८ नोव्हेंबर
१८९० > सामाजिक सुधारणेसंबंधी क्रांतिकारक विचार मांडणारे महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचे निधन. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड या दीर्घ निबंधांतून त्यांनी भारताच्या सामाजिक-आर्थिक स्थितीची मीमांसा केली. अनेक ‘अखंड’ (अभंगवजा रचना), तृतीय रत्न हे सामाजिक नाटक (१९६९) त्यांनी लिहिले.
१९०२ > लोकभाषांचे अभ्यासक केशव शिवराम भवाळकर यांचे निधन. वऱ्हाडी भाषेचे व्याकरण विशेष, गौंड लोक व गौंडी भाषा या दोन निबंधांसह कृष्णशास्त्री चिपळूणकर व भाऊ महाराज यांच्यावर चरित्रलेख व आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.
१९३८ > ‘रंगभूमी’ या मासिकाचे संस्थापक शंकर बापूजी मुजुमदार यांचे निधन. मुद्रण दर्पण, महाराष्ट्रीय नाटककारांची चरित्रे व अण्णासाहेब किलरेस्करचरित्र त्यांनी लिहिले.
१९४४ > लेखक, संपादक, प्रकाशक, दामोदर सावळाराम यंदे यांचे निधन.
१९५९ > झाडाझडती, पानिपत, महानायक आदी लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक विश्वास महिपती पाटील यांचा जन्म.
१९६५ > पानिपत लढाई व निजाम-पेशवे संबंधावर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. त्यांच्या अपूर्ण शिवचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
– संजय वझरेकर