टेक्सास अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्परिमेंट स्टेशनवरील शास्त्रज्ञांनी चंद्र व मंगळावरील वातावरणाची नक्कल करून हिरव्यागार लेटय़ूस भाजीची वाढ करण्यात यश मिळविले आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारी ही भाजी दीर्घकाळ अंतराळ प्रवास करणाऱ्यांची केवळ दैहिक नव्हे तर मानसिक गरजसुद्धा भागवू शकते, कारण भोवतालचा हिरवा निसर्ग ही माणसाची भूक असते.
मातीचा अभाव व कमी गुरुत्वाकर्षणाच्या पाश्र्वभूमीवर झाडाझुडपांची वाढ करणे हे एक आव्हान आहे. चंद्रावरील वातावरणात दाब नाही, त्यामुळे तिथे ढग, पावसाचा पत्ता नसतो. तिथले गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक षष्ठांश आहे. तिथे पंधरा दिवस काळोख व पंधरा दिवस उजेड असतो. शिवाय, प्रकाश-संश्लेषणासाठी (अन्न-निर्मितीसाठी) आवश्यक असलेला कार्बनचा अंश तिथे नाही. याउलट, मंगळ कार्बन डायॉक्साइडने व्यापलेला! तिथला वातावरणीय दाब पृथ्वीच्या एक शंभरांश! तिथला दिवस पृथ्वीच्या २४ तासांपेक्षा मोठा असला तरी तिथे सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी असते. तेव्हा, वनस्पतीच्या वाढीसाठी अनुकूल अशा वातावरणाचे कप्पे निर्माण करून त्यात झाडे, रोपटी वाढविण्याचा संशोधकांचा मानस आहे.
विशेष म्हणजे वातावरणाचा दाब कमी असेल तर तो झाडांच्या वाढीसाठी अनुकूल ठरतो, ही बाब संशोधकांना उत्साहवर्धक वाटते आहे. शिवाय, एथिलीनसारख्या वायूच्या सान्निध्यात वनस्पती जोमाने वाढताना आढळलेल्या आहेत. चंद्र आणि मंगळावरील जमिनीत खास प्रकारचे ‘ग्रोथ चेंबर्स’ तयार करून भाजीपाला पिकविता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो.
फ्लोरिडा विद्यापीठातील डॉ. वाग्नर बेद्राम व त्याचे सहकारी अंतराळात जत्रोफाची लागवड करून जैविक इंधन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जत्रोफाच्या रोपटय़ाचे  ‘कल्चर’ अंतराळात पाठवून त्याच्या वाढीवर व त्याच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलावर या संशोधकांचे लक्ष आहे.
संशोधकांनी अंतराळात बटाटय़ाच्या कलमाच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. पृथ्वीपेक्षा अंतराळात वाढलेल्या बटाटा रोपटय़ाच्या मुळात कमी स्टार्च व जास्त साखर आढळली. तसेच, त्या अंतरिक्ष रोपांची मुळे तुलनात्मकदृष्टय़ा अधिक जोमाने वाढली होती. पृथ्वीवर वाढविलेले कलम गुरुत्वाकर्षणाचा अभाव असलेल्या अंतराळात जोमाने वाढतात, हा महत्त्वपूर्ण दुवा या संशोधनातून हाती लागला आहे.

जे देखे रवी.. – प्रवास
समजा एखादा गाडीत चढतो पथारी पसरतो नाही तोवर त्याला दमल्यामुळे झोप लागते. मग सकाळी दादर, दादर असा गलबला सुरू होतो तेव्हा हा उतरतो आणि म्हणतो, ‘काय झोप लागली. दादर आले ते कळलेच नाही’. डब्यातून कोण उतरले-चढले याचा पत्ता नाही. सुरतला सिग्नलला अर्धा तास गाडी रखडली. मग पुढे जी सुटली ती बोरिवलीला वेळेच्या आधी धडकली. उपनगरीय गाडय़ांच्या बरोबर खाड-खाड आवाज करीत दादरला आली आणि याला जाग आली. प्रवास मस्त झाला आणि मग तो ताजातवाना कामाला गेला. ओवी म्हणते (ज्ञा. ५/८)
मोडणार नाही निद्रा। तरी मारेन लांब पल्ला। असा काहीतरी सल्ला। मला दे
तेव्हा सर्व प्रकारच्या स्त्री-पुरुषांना कर्मयोगच बेहत्तर आहे, असे श्रीकृष्ण म्हणतो. अर्थात हे वाचायला सोपे, पण करणे कर्मकठीणच. कर्मकठीण असते कारण त्यातून काय उद्भवेल याची खात्री नसते, पण काटय़ाने जसा काटा काढतात तसेच कर्म करूनच कर्म निपटावे लागते. खाटल्यावर बसून कोणालाही काही मिळत नाही. चौथ्या अध्यायात ‘मी निष्काम कर्म कधी केलेच नाही. काहीतरी मिळविण्यासाठीच सतत करीत आलो आहे.’ असे आपल्या जीवनप्रवासाचे वर्णन अर्जुन करतो, असे गृहीत धरून श्रीकृष्ण म्हणतो, ‘मग सकाम तरी कर, तू बुद्धिमान आहेस हळूहळू तुला या मिळविण्याचा कंटाळा येईल आणि मग तू मिळो न मिळो काम करीतच राहशील.’ १८व्या अध्यायातला कर्माबद्दलच्या ओव्यांचा मथितार्थ असा दिसतो की, स्नान-संध्या आणि श्राद्धे। होतात सहजपणे। पण काम्य कर्माला मात्र। उगवतात फळे॥
हा फळांचा बाजार माणसाला बेजार करतो, अशी भारतीय आणि वैदिक तत्त्वज्ञानाची एक फार उंच उडी आहे. ज्या तऱ्हेने कर्माबद्दल आपल्या तत्त्वज्ञानात चर्चा आहे तशी चर्चा इतरत्र नसणार. आम्ही गेली दीड हजार वर्ष नाकर्ते ठरलो हे नक्कीच पण तो दोष आपल्या तत्त्वज्ञानाचा नाही. कारण या ओव्या बघा :
करत राहा कर्म। तोच तुमचा धर्म। तोच तुमचा यज्ञ। असे म्हणाला ब्रह्मज्ञ (ब्रह्मदेव)
करू नका व्रते। शरीराला देऊ नका पिडा। दूर कुठे तीर्थाला। जाऊ नका।
योगाचे जीव घेणे प्रकार। मंत्रतंत्राचे उपचार।
काहीतरी मागण्यासाठी। देवाला दिलेला प्रसाद
हे काही करू नका, असे स्पष्ट सांगितले आहे तेव्हा
फळाच्या आशेने केलेले कर्म। होऊ शकते विफळ।
पण कर्म हेच असेल फळ। तर ते कर्म होईल कसे विफळ।।
 .. वैफल्य हा शब्द असा आला आहे.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – वातविकार : भाग ४
अनुभविक उपचार – धातुक्षय – सुवर्णमाक्षिकादि, चंद्रप्रभा प्र. ३ गोळ्या २ वेळा गरम दुधासह रिकाम्या पोटी घेणे. गरम दुधामध्ये शतावरी कल्प ३ चमचे घेण्याने अधिक फायदा होतो. च्यवनप्राश सकाळ-सायं. २ चमचे, वर दूध प्यावे. कृश रुग्णांस अश्वगंधापाक २ चमचे, कुष्मांडपाक ३ चमचे २ वेळा द्यावा. भूक कमी असताना, पोटात वायू धरत असल्यास जेवणांनंतर ४ चमचे अश्वगंधारिष्ट वा दशमूलारिष्ट समभाग पाण्याबरोबर घ्यावे. पांडुता, थकवा, दुबळेपणा अधिक असणाऱ्यांनी लक्ष्मीविलास ३ गोळ्या २ वेळा बदाम कल्पाबरोबर घ्याव्यात. उदरवात – शंखवटी ३ गोळ्या, पाचक चूर्ण अर्धा चमचा, पिप्पलादि काढा ४ चमचे समभाग पाण्याबरोबर दोन्ही जेवणानंतर घेणे. दीर्घकाळची तक्रार असल्यास त्रिफळा गुग्गुळ रिकाम्या पोटी २ वेळा बारीक करून; रात्रौ एरंडहरीतकी, गंधर्व हरीतकी चूर्ण १ चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. अंगमर्द – लघुमालिनी वसंत सहा, ज्वरांकुश तीन सकाळ-सायंकाळ रिकाम्यापोटी, रात्रौ आस्कंदचूर्ण १ चमचा, पाव चमचा सुंठचूर्ण पाण्यात मिसळून घ्यावे. मानेचे विकार – लाक्षादिगुग्गुळ, सिंहनाद, आरोग्यवर्धिनी प्र. ३ गोळ्या २ वेळा, रात्रौ लेप गोळी उगाळून दाट गरम लेप मानेच्या सुजेवर लावावा. सकाळ-सायं. आंघोळीपूर्वी महानारायण तेलाने मसाज करावे. नंतर गरम पाण्यात मीठ टाकून शेकावे. कंपवात – लघुमालिनीवसंत ६, लाक्षादिगुग्गुळ, ब्राम्हीवटी प्र. ३ गोळ्या अशा १२ गोळ्या २ वेळा रिकाम्या पोटी घ्याव्यात. झोपताना निद्राकरवटी ६ गोळ्या आस्कंदचूर्ण १ चमचा घ्यावे. मलावरोध, उदरवात ही अधिक लक्षणे असल्यास रात्रौ गंधर्वहरीतकी एक चमचा, दोन्ही जेवणानंतर सौभाग्यसुंठ अर्धा चमचा घ्यावे. अर्दित  – शतावरीसिद्ध तेलाच्या गुळण्या, हे तेल कानात टाकणे, थोडय़ा वेळाने काढून टाकणे. डोक्यावर या तेलाची  पट्टी ठेवावी. तळपायास शतधौतघृत चोळावे. नाकात तुपाचे थेंब सोडावेत. शतावरीकल्प ३ चमचे दोन वेळा दुधाबरोबर घेणे. सिंहनाद, लाक्षादि, आरोग्यवर्धिनी प्र. तीन गोळ्या २ वेळा घ्याव्यात.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २६ जून
१९०४> प्राचीन हस्तलिखितांचे संशोधक व सूचिकार सदाशिव लक्ष्मीधर कात्रे यांचा जन्म. त्यांच्या लेखांचे पुस्तक झाले नाही, परंतु मराठी संशोधन पत्रिकेत या लेखांची सूची प्रसिद्ध झाली.
१९०५> कथालेखिका कमलाबाई विष्णू टिळक यांचा जन्म. त्यांच्या कथांचे ‘हृदयशारदा’, ‘आकाशगंगा’ हे संग्रह तसेच ‘स्त्रीजीवनविषयक प्रश्न’‘स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे’,  ही पुस्तके व बालसाहित्य पुस्तकरूप झाले.
१९८० >  पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा अप्पा पेंडसे यांचे निधन. ‘विविधवृत्त’ व सिनेसाप्ताहिक ‘तारका’ यांतून ते अत्र्यांच्या ‘मराठा’त स्थिरावले, तेथे ‘महापालिकेत मंबाजी’ हे सदर, तर ‘लोकसत्ता’मधून त्यांनी ‘एक्स्प्रेस टॉवरवरून’ हे सदर लिहिले.  
२००१ > ख्यातनाम कथाकार आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे यांचे निधन. ‘कर्मचारी’, ‘फॅण्टसी’, ‘संवादिनी’, ‘स्वर’ आदी २५ कथासंग्रह, ‘ही वाट एकटीची’ही कादंबरी आणि ‘मोदी अ‍ॅण्ड मोदी’, ‘रात्र नको चांदणी’ ही नाटके , ‘वाट पाहणारे दार’ आणि ‘सांगे वडिलांची कीर्ती’ ही आप्तांविषयीची पुस्तके, तसेच उत्तरायुष्यात ओशोंच्या प्रवचनांवर आधारित ‘आपण सारे अर्जुन’ ही त्यांची पुस्तके.
– संजय वझरेकर