सतराव्या शतकाचा काळ! या काळात, विविध रासायनिक प्रक्रियांबद्दल रसायनतज्ज्ञांना कुतूहल निर्माण झाले होते. आणि या प्रक्रियांबद्दल तेवढय़ाच गरसमजुतीही निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक गरसमजूत म्हणजे विविध धातूंना सोन्यामध्ये रूपांतरित करणाऱ्या ‘परीस’ या पदार्थाचे अस्तित्व! अनेक परिश्रम घेऊनही रसायनतज्ज्ञांना- ज्यांना अल्केमिस्ट म्हटले जात असे त्यांना – परीस काही सापडला नाही; पण परिसाचा शोध घेताना सापडलेल्या एका पदार्थाचे नाव, रसायनशास्त्राच्या इतिहासात ‘प्रयोगशाळेत शोधले गेलेले पहिले मूलद्रव्य’ म्हणून नोंदले गेले.
इ. स. १६६९ च्या सुमारास हेनिश ब्रांड हा जर्मन अल्केमिस्ट परिसाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी तो माणसाच्या लघवीवर काही प्रयोग करीत होता. या प्रयोगासाठी त्याने साडेपाच ते सहा हजार लिटर मानवी लघवी जमवली. ती काही दिवसांसाठी तशीच ठेवून त्यात त्याने जिवाणूंची वाढ होऊ दिली. त्यातली सुमारे एक हजार लिटर म्हणजे सुमारे पन्नास बादल्या लघवी उकळवून त्याने त्यातले पाणी काढून टाकले. त्यानंतर मागे राहिलेला खळीसारखा पदार्थ त्याने अतिशय उच्च तापमानाला गरम केला. त्यातून त्याला मिळाला एक पांढरा, मेणासारखा आणि रात्रीच्या अंधारात प्रकाशणारा पदार्थ! परिसाच्या शोधात असलेल्या ब्रांडला हा पदार्थ कोणता हे कळले नाही. त्याने या पदार्थाला ग्रीक शब्दावरून, ‘फॉस्फरस’ म्हणजे ‘प्रकाश धारण करणारा’ म्हणून संबोधले.
हेनिश ब्रांडने आपला हा शोध जवळपास सहा वष्रे गुप्त ठेवला. पशाची चणचण जाणवू लागल्यानंतर कालांतराने त्याने हा प्रकाशणारा पदार्थ डॅनिएल क्राफ्ट या जर्मन वैद्यकतज्ज्ञाला विकला. त्यानंतर हा वैशिष्टय़पूर्ण पदार्थ युरोपमध्ये अनेकांना दाखवला गेला. इ. स. १६७८-८० च्या सुमारास जर्मन संशोधक योहान कंकेल आणि आयरिश संशोधक रॉबर्ट बॉयल यांनाही मानवी लघवीपासूनच हा प्रकाशणारा पदार्थ मिळवण्यात यश आले. त्यानंतर सुमारे एका शतकानंतर, स्फोटक गुणधर्म असणारा हा पदार्थ हाडांपासून नायट्रिक किंवा सल्फ्युरिक आम्ल व कोळशाबरोबरच्या रासायनिक क्रियेद्वारेही तयार करता येतो हे दिसून आले आणि या पदार्थाचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाले. मूलद्रव्यांची संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच रसायनतज्ज्ञ आन्त्वान लव्हॉयजे याने प्रसिद्ध केलेल्या ३३ मूलद्रव्यांच्या यादीत या पदार्थाचा समावेश केला गेला.
– डॉ. मानसी राजाध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org