‘मंझिल’ हा अली सरदार जाफ़री यांचा पहिला कथासंग्रह १९३८ मध्ये  प्रसिद्ध झाला, तर १९४३ मध्ये पहिला काव्यसंग्रह ‘परवाज’ प्रकाशित झाला. दोन नाटके, एक प्रवासवर्णन, एक आत्मकथन, संपादन समीक्षा अशा विविध स्तरांवर त्यांचे लेखनकार्य सुरू होते. बालपणी त्यांच्या गावात एक सरमिसळ सांस्कृतिक जीवन होते.  घरच्या सुसंस्कृत वातावरणाने त्यांच्यावर अनेक विद्वान मौलवींचे संस्कार झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मर्सिया’ या शोककाव्यातून त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन झाल्याने त्यांचे पालक, नातेवाईक, गुरू सर्वच भारावून गेले होते. ‘परवाज’ (१९४३), ‘खून की लकीर’ (१९४९), ‘पत्थर की दीवार’ (१९५३) ते ‘नवम्बर मेरा गहवारा’ (१९९८) पर्यंत त्यांचे दहा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले, त्यापैकी १९४८ मध्ये प्रकाशित झालेला ‘नई दुनिया को सलाम’ या दीर्घ रूपकात्मक काव्यसंग्रहाचा ‘नव्या जगाला प्रणाम’ हा श्रीपाद जोशी यांनी केलेला मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे.

कबीर, मीर, गालिब यांच्या काव्याचे संपादित काव्यसंग्रह प्रास्ताविकासह त्यांनी प्रकाशित केले असून, ‘उर्दू काव्यकोशा’च्या सहा खंडांचे संपादनही त्यांनी केले आहे. इप्टासाठी ‘यह किसका खून है’ (१९४३) आणि ‘पॅकर’ (१९४३) ही दोन नाटकेही त्यांनी लिहिली. जाफ़री यांना शेरोशायरीतील रुची शालेय वयापासूनच होती. या शायरीमध्ये त्यांनी आदर्श जीवनाची स्वप्ने पाहिली. त्यांच्या शायरीत जीवनातील चढउतार दिसतात, पण शेवट यशानेच होतो हा आशावादच ते ‘पत्थर की दीवार’मध्ये व्यक्त करतात:

‘अंध:काराच्या ढगातून, काजव्यांचा पाऊस..

ठिणग्यांचं नृत्य, सगळीकडे अंधार..

कुणीच सांगू शकत नाही की,

कोणती ठिणगी कधी बेचैन होईल

आग ओकू लागेल

आणि क्रांती होईल..’

साम्यवादी दृष्टिकोनातून राजकीय जीवनातील समस्या, ते आपल्या काव्यातून मांडतात असे नाही तर सगळ्या मानवी इतिहासावर आधारित अशा कविताही ते लिहितात. सौंदर्य ऋतूंचे असो, दृश्यांचे असो, मुंबईच्या गल्ल्यांचे असो वा तुरुंगातील एकाकी संध्याकाळचे .. हे सगळेच त्यांना काव्यलेखनासाठी प्रभावित करते. त्यांच्या १९९८च्या ‘नवम्बर मेरा गहवारा’ या आत्मकथनात्मक कवितेत ते म्हणतात –

‘मुझे सूरज ने पाला, चांदनी की किरनों ने नहलाया..

चिडियों के नग्मे मै समझता था

हवा में तितलियाँ परवाज करती थी

मै उनके साथ उडता था..’

मंगला गोखले  

manglagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ali azar jafari poem