आपल्या शरीरात इंधन म्हणून कबरेदकांचा वापर होतो. चपाती, भात, भाकरी, पाव, बटाटा, इतर धान्ये, कडधान्ये यांपासून आपल्याला कबरेदके मिळतात. आपल्या आहारातील बहुतेक कबरेदकांत स्टार्चचं प्रमाण जास्त असतं.
तसं पाहायला गेलं तर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हेदेखील ऊर्जेचे स्रोत आहेत. एक ग्रॅम कबरेदकापासून ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. एक ग्रॅम प्रथिनांपासूनदेखील ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते, तर एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. पण प्रथिनं व स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी शरीराला कबरेदकांच्या तुलनेत जास्त पाणी लागतं. बहुतेक प्राण्यांत कबरेदके हाच ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. आपल्या मेंदूला कबरेदकांची विशेषत: ग्लुकोजची आवश्यकता असते. चेतापेशी(न्युरॉन्स) स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळवू शकत नाहीत.
शरीरात कबरेदकांपकी फक्त मोनो सॅकॅराइड्स् (एकशर्करा) पचनसंस्थेतून थेट रक्तात मिसळू शकतात. तसे डायसॅकॅराइड्स् (द्विशर्करा) आणि पॉलीसॅकॅराइड्स् (बहुशर्करा म्हणजे स्टार्च वगरे) थेट रक्तात मिसळू शकत नाहीत. त्यांचे शरीरातील विकरांच्या मदतीने विघटन केलं जातं. लहान आतडय़ांत पचनाची प्रक्रिया पूर्ण होते. येथे कबरेदकांचे रूपांतर एकशर्करेत होतं. उदा. सुक्रोजचे विघटन होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होते. तर लॅक्टोजच्या विघटनातून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज वेगळे होतात. स्टार्चचे विघटन प्रथम माल्टोजमध्ये आणि नंतर ग्लुकोजमध्ये होतं.
लहान आतडय़ांतली रूपांतरित एकशर्करा रक्तातून यकृतात आणली जाते. यकृतात फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. हे ग्लुकोज रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींना पोहोचतं. पेशींमध्ये याच ग्लुकोजचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी, वाढीसाठी, ऊतींच्या बांधणीसाठी, दुरुस्तीसाठी केला जातो. शरीरातील कार्यासाठी वापरल्यानंतरही जे ग्लुकोज शिल्लक राहतं, यकृत त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं. ग्लायकोजन यकृतात आणि काही प्रमाणांत स्नायूंमध्ये साठवून ठेवलं जातं. जेव्हा रक्तातील शर्करेची पातळी कमी होते तेव्हा यकृत साठवलेल्या ग्लायकोजनचे रूपांतर परत ग्लुकोजमध्ये करतं आणि रक्तातून पेशींना पुरवलं जातं. जेव्हा शरीराला तातडीने ऊर्जेची गरज असते, तेव्हा स्नायूंमध्ये साठवलेल्या काही ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते.
बहुतेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मानवाच्या शरीराची ४० ते ६५% गरज कबरेदकांद्वारे भागवली जाते आणि १०% गरज ग्लुकोजसारख्या साध्या एकशर्केरेद्वारा भागवली जाते.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा : नकारात्मक विचारांचा गडगडणारा धोंडा
हे बघ, तुझ्याशी बोलून या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं ठरवलंय मी. तुझ्याशी बोलण्याचं धाडस करतोय, धाडस अशासाठी की, कोणाशी बोलून काही उपयोग असं वाटतं. म्हणजे असा नकारात्मक विचार मला छळत होता. त्याला बाजूला सारून मी बोलतोय. केवळ याच बाबतीत नाही रे, मला नकारात्मक विचार सारखे छळतात. काही नवीन करायचं म्हटलं की, आला निगेटिव्ह विचार म्हणून समज.
गंमत म्हणजे? गंमत कसली म्हणा, सुरुवात एखाद्या नकारात्मक विचारानं होते. मग त्याच्याशी सोडून तसल्याच नकारात्मक एकात एक गुंफलेल्या विचारांची मालिका सुरू होते. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे विचार येतात. हळूहळू त्या विचारांचा वेग वाढत जातो. उंच कडय़ावरून एखादा धोंडा पडतो.. गडगडत खाली येतो. गडगडताना त्या धोंडाचा वेग झपाटय़ानं वाढतो तसं होतं.
विशेष म्हणजे, यातील पहिला नकारात्मक विचार कोणता याचाही विसर पडतो. हैराण व्हायला होतं. प्रत्येक विचारामुळे मनात निराश निर्माण होते. आणि त्या निराशेतून वाट काढावी लागते. प्रत्येक नकारात्मक विचाराची समजूत काढावी लागते. यात माझा वेळ नि शक्ती खर्च होते.
मी त्यातून मार्ग काढतो, पण कंटाळून जातो. काय करू या विचारांचं? समजत नाही. तेव्हा ठरवलं, तुझ्याशी बोललो तर निदान मन मोकळं तरी होईल. विचार करून करून असं वाटलं की अजून प्रगती करायची तर या नकारात्मकांचं काहीतरी केलं पाहिजे. धोरण ठरवलं पाहिजे.
असं केलं तर?
(१) नकारात्मक विचारांच्या मालिकेची सुरुवात एखाद्या साध्या-सुध्या विचाराने होते, तेव्हा तो विचार तसा क्षुल्लक असतो. म्हणजे एखाद्या विषारी बीला अंकुर फुटताना खुडून टाकलं तर त्याची वेल वाढतच नाही. म्हणजे, कडय़ावरून धोंडा पडताच उचलून फेकून दिला पाहिजे.
(२) नकारात्मक विचार मला काहीतरी सुचवतो म्हणजे एखाद्या गोष्टीत पराजय कसा होईल, नवे प्रश्न-नव्या अडचणी कशा येतील? याविषयी धोक्याचे सिग्नल असतात. धोके आहेत म्हणून प्रवास टाळता येत नाही. रस्त्यावर चौकात लाल दिव्यांचे सिग्नल असतात म्हणून कोणी गाडी चालवायचं सोडून देत नाही.
धोक्याची सूचना मिळाली तर नव्या प्रोजेक्टमध्ये किती जोखीम पत्करावी लागेल? याचा अंदाज घेता येईल आणि त्यानुसार कामाची आखणी करता येईल. म्हणजे नकारात्मक विचारांकडे संकट म्हणून अजिबात बघायचं नाही. आपल्याला अधिक सजग राहण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा.
(३) त्यातूनही नकारात्मक विचार येत राहिले तर? तर काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं! अरेच्च्या, मी नकारात्मक विचारांकडे फारच सिरियसली बघतो. त्यांना इतकं महत्त्व कशाला द्यायचं! आपण लक्ष दिल्यामुळेच ते मनात पसरत जातात आणि मनाचा ठाव घेतात. म्हणजे आपण अशा नकारात्मक विचारांना मनाचा ताबा घेण्याची परवानगी देतो. आपण या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष केलं तर ते नक्कीच आपला गाशा गुंडाळतील. आपण त्या विचारांकडे लक्ष देतो म्हणजे आगीत जणू तेल ओततो आणि मग ‘आग,आग.. वाचवा..’, असा आरडाओरडा करतो! हे मी आणि फक्त मीच थांबवू शकतो.
(४) आता फक्त या तीन विचारांचं भान ठेवायचं आणि काम फत्ते! थांब, अजून खूप सुचतंय, पण मनमोराचा पिसारा फुलला असं वाटतंय.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व- दुसऱ्यांबरोबर राहण्याची आकांक्षा असलेल्या समाजात फूट पडत नाही
‘‘या देशात राष्ट्रीयत्वाच्या आड येणारे तीन वाटमारे आहेत. ‘तौ हि अस्य परिपंथिनी’ असे भगवद्गीतेत म्हटले आहे. तर हे तीन परिपंथी आहेत. पहिला परिपंथी, वाटमाऱ्या, हा संप्रदाय आहे. दुसऱ्या वाटमाऱ्याचे नाव आहे जात आणि तिसरा आहे भाषा. या देशातून संप्रदायाचे निराकरण होणे हे राष्ट्रीयत्वाच्या उदयाला आवश्यक असे पहिले पाऊल आहे. संप्रदायाचा आद्य प्रवर्तक, त्याचा जनक या देशातला मुसलमान आहे. पण त्याच्यापर्यंत तो मर्यादित राहिला नाही. हिंदूंनी त्याची नक्कल केली, अनुकरण केले, प्रतिसंप्रदायवाद उभा केला, आणि या दोहोंहून वरचढ असा एक संप्रदायवाद या देशामधे शिखांनी निर्माण केला. त्यामुळे राष्ट्राचे जे तुकडे झाले ते कुठल्याहि एका मुद्यावर झाले नाहीत. संप्रदाय हेच जर राष्ट्र असेल तर मग एका बंगालचे दोन बंगाल झाले, पण त्यानंतर बंगाल आणि आसाम हेहि वेगळे झाले, कारण यांची भाषा वेगळी आहे. म्हणजे एका पंजाबचे दोन पंजाब, एका बंगालचे दोन बंगाल संप्रदायाच्या नावावर झाले आणि उरलेल्या प्रदेशाचे तुकडे पुन्हा भाषेच्या नावावर झाले.’’
आचार्य दादा धर्माधिकारी यांनी राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेला अनुलक्षून अनेक भाषणे दिली, अनेक लेख लिहिले. त्यापैकी १९६९ सालच्या ‘एक राष्ट्र, एक जनता’ या लेखात ते म्हणतात – ‘‘राष्ट्रीयत्वाचे मुख्य लक्षण एकमेकांच्या बरोबर राहण्याची तयारी नव्हे, तर बरोबर राहण्याची इच्छा. ज्यांच्यात एकमेकांबरोबर राहण्याची इच्छा नसेल, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाचा विकास होऊ शकत नाही. आमचे विनोबा नेहमी म्हणतात की, आम्ही ग्रामदान करवतो नंतर ग्रामस्वराज्य. आम्ही म्हटले जोपर्यंत गावामध्ये कुंभारपुरा, कोमटीपुरा, हा भंगीपुरा अशी जातिस्थाने आहेत तोपर्यंत काय होणार? दुसऱ्यांच्या बरोबर राहण्याची आकांक्षा ज्या समाजात आहे त्या समाजामध्ये फूट निर्माण होऊच शकत नाही. भारतवर्षांत भिन्न भिन्न संप्रदायांच्या लोकांना एकमेकांच्या शेजारी जगणे शक्य झाले, पण एकमेकांच्याबरोबर जगणे शक्य झाले नाही. आम्ही एकमेकांच्याबरोबर नाही जगू शकलो. शेजारी जगू शकलो.’’