आपल्या शरीरात इंधन म्हणून कबरेदकांचा वापर होतो. चपाती, भात, भाकरी, पाव, बटाटा, इतर धान्ये, कडधान्ये यांपासून आपल्याला कबरेदके मिळतात. आपल्या आहारातील बहुतेक कबरेदकांत स्टार्चचं प्रमाण जास्त असतं.
तसं पाहायला गेलं तर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ हेदेखील ऊर्जेचे स्रोत आहेत. एक ग्रॅम कबरेदकापासून ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. एक ग्रॅम प्रथिनांपासूनदेखील ४ किलोकॅलरी ऊर्जा मिळते, तर एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ किलोकॅलरी ऊर्जा मिळते. पण प्रथिनं व स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी शरीराला कबरेदकांच्या तुलनेत जास्त पाणी लागतं. बहुतेक प्राण्यांत कबरेदके हाच ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत आहे. आपल्या मेंदूला कबरेदकांची विशेषत: ग्लुकोजची आवश्यकता असते. चेतापेशी(न्युरॉन्स) स्निग्ध पदार्थापासून ऊर्जा मिळवू शकत नाहीत.
शरीरात कबरेदकांपकी फक्त मोनो सॅकॅराइड्स् (एकशर्करा) पचनसंस्थेतून थेट रक्तात मिसळू शकतात. तसे डायसॅकॅराइड्स् (द्विशर्करा) आणि पॉलीसॅकॅराइड्स् (बहुशर्करा म्हणजे स्टार्च वगरे) थेट रक्तात मिसळू शकत नाहीत. त्यांचे शरीरातील विकरांच्या मदतीने विघटन केलं जातं. लहान आतडय़ांत पचनाची प्रक्रिया पूर्ण होते. येथे कबरेदकांचे रूपांतर एकशर्करेत होतं. उदा. सुक्रोजचे विघटन होऊन ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होते. तर लॅक्टोजच्या विघटनातून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज वेगळे होतात. स्टार्चचे विघटन प्रथम माल्टोजमध्ये आणि नंतर ग्लुकोजमध्ये होतं.
लहान आतडय़ांतली रूपांतरित एकशर्करा रक्तातून यकृतात आणली जाते. यकृतात फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. हे ग्लुकोज रक्ताद्वारे शरीरातील सर्व पेशींना पोहोचतं. पेशींमध्ये याच ग्लुकोजचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी, वाढीसाठी, ऊतींच्या बांधणीसाठी, दुरुस्तीसाठी केला जातो. शरीरातील कार्यासाठी वापरल्यानंतरही जे ग्लुकोज शिल्लक राहतं, यकृत त्याचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतं. ग्लायकोजन यकृतात आणि काही प्रमाणांत स्नायूंमध्ये साठवून ठेवलं जातं. जेव्हा रक्तातील शर्करेची पातळी कमी होते तेव्हा यकृत साठवलेल्या ग्लायकोजनचे रूपांतर परत ग्लुकोजमध्ये करतं आणि रक्तातून पेशींना पुरवलं जातं. जेव्हा शरीराला तातडीने ऊर्जेची गरज असते, तेव्हा स्नायूंमध्ये साठवलेल्या काही ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते.
बहुतेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मानवाच्या शरीराची ४० ते ६५% गरज कबरेदकांद्वारे भागवली जाते आणि १०% गरज ग्लुकोजसारख्या साध्या एकशर्केरेद्वारा भागवली जाते.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – कबरेदके-ऊर्जा स्रोत
आपल्या शरीरात इंधन म्हणून कबरेदकांचा वापर होतो. चपाती, भात, भाकरी, पाव, बटाटा, इतर धान्ये, कडधान्ये यांपासून आपल्याला कबरेदके मिळतात. आपल्या आहारातील बहुतेक कबरेदकांत स्टार्चचं प्रमाण जास्त असतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-08-2014 at 01:49 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aliphatic substance for energy source to body