वजन, उंची, लांबी, रुंदी, घनता, तास, मिनिटे यांच्याशी आपला रोजचा संबंध आहे. मग त्यात प्रमाणीकरण असणे किंवा आणणे आवश्यक वाटणे साहजिकच आहे.

ब्रिटिशांनी फूट, पाउंड, तास, मिनिटे अशी मापे रूढ केली. त्यामुळे इंच, फूट, मल, एकर, औंस, पाउंड, गुंठा अशी मापे आपण सर्रास वापरू लागलो. यातदेखील अमेरिकन मापे व ब्रिटिश इम्पिरिअल मापे यांत काहीसा फरक होता. विशेषत: गॅलनमध्ये.

१७९० मध्ये फ्रेंच सायन्स अ‍ॅकॅडमीने एक वेगळी प्रणाली आणली. त्यातून पुढे मेट्रिक सिस्टीमचा जन्म झाला. १८७५ मध्ये १७ राष्ट्रांनी ही प्रणाली स्वीकारली. १९५४ मध्ये आजची मेट्रिक सिस्टीम (रक) सर्वमान्य झाली. ब्रिटिशांनीसुद्धा त्याचा अंगीकार केला. फक्त अमेरिकेत मात्र अजूनही फूट, मल, पाउंड, गॅलन यांचाच सरसकट वापर केला जातो.

आपल्याकडेही वयस्कर मंडळी उंची फूट-इंचात सांगतात. सुतारही अजून मोजमाप फूट- इंचातच करतो. परंतु इंजिनीअर, आíकटेक्ट मात्र मिलिमीटर, सेंटिमीटरचा वापर करताना दिसतात. आपण आता जागतिकप्रमाणे वापरणेच आवश्यक आहे. दोन्ही प्रणाली कार्यरत ठेवल्यास प्रचंड गोंधळ उडू शकतो.

असाच एक गोंधळ नासाला १२५ मिलियन डॉलर्सना पडला. त्याचे झाले असे की,  मंगळावर पाणी-जीवसृष्टी अस्तित्वात आहे वा होती का, हे शोधण्याकरिता नासाने मार्स ऑर्बटिर हे यान मंगळावर पाठवले. २८६ दिवसांच्या प्रवासानंतर प्रोबने मंगळाच्या

वातावरणात शिरण्यासाठी आणखी एक इंजिन सुरू केले. त्यावेळी मात्र ते मंगळाच्या ६० किमी (३६ मलाच्या) कक्षेत म्हणजे ठरवल्यापेक्षा १०० किलोमीटर जास्त जवळ पोहोचले. त्यामुळे अति जास्त गरम होऊन बहुधा नष्ट झाले असावे वा आणखी पुढे गेले असावे. असे का झाले, याचे कारण धक्कादायक होते.

लॉकहीड मार्टनि नावाच्या कंपनीने मार्स ओर्बटिर यानाची बांधणी केली होती, त्यावेळी त्यांच्या अभियांत्रिकी चमूने इंग्लिश युनिट्स वापरली. त्यावेळी नासाची टीम १९९०पासून मेट्रिक सिस्टीम वापरत होती. जेट प्रोपल्शन लेबोरेटरीचे टॉम गॅव्हीन यांनी चूक मान्य करीत म्हटले की, चेकिंग व्यवस्थित झाले नाही. लॉरेल यंग, अमेरिकन मेट्रिक असोसिएशनच्या अध्यक्षांनी  कबुली दिली की, दोन प्रणाली वापरत असल्याने गोंधळ उडाला.

थोडक्यात वजने, मापे यांचे जगभर प्रमाणीकरण आवश्यक आहे, हे यामुळे अधोरेखित होते.

प्रा. कविता रेगे

 

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अमृता प्रीतम- विचार

ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात अमृता प्रीतम यांनी एकूणच लेखनाविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्या म्हणतात, ‘मी का लिहिते?.. माझ्या दृष्टिकोनातून लेखन हा माझ्यापासून मीपर्यंत पोहोचण्याचाच एक प्रवास होता. असा प्रवास ज्यात पहिल्यांदाच ‘मी’ची ओळख होते. मग ‘तू’ची आणि त्यानंतर ‘त्या’ची ओळख होते. त्यात सगळ्या जगाचा समावेश होतो.

ही ती जागा आहे, जिथे दुसऱ्याचं दु:खही आपलं होऊन जातं. त्यामुळे संवेदनेची तीव्रता आणि अनुभूतीची सघनता ही ‘मी’चं ‘कर्म’ होऊन जाते. सुगंध जसा फुलाचा सहजधर्म असतो तसा सहजधर्म. ही अशी जागा आहे, असा बिंदू आहे की, जिथं लेखकाचं चिंतन, वाचकाचं आपलं चिंतन बनून जातं. जे वाचकांसाठी आदिम वास्तव होतं ते त्याच्यासाठी अंतिम वास्तव राहत नाही. यातलं सत्य हे आहे की, असंभव हे संभवाच्या परिघात येतं. हे ठीक आहे की, वाचकांच्या जीवनातलं वास्तव आणि त्याच्या कल्पनेतलं वास्तव एकमेकांवर आदळतात. पण या धडकेतूनच त्याच्या मनात किती तरी प्रश्न उठतात. तसे ते प्रश्न त्यांच्या मनात असलेही पाहिजेत. माझ्या मते जे वास्तव असेल ते दाखवणं आणि जे व्हायला हवं तेही पाहणं हाच लेखणीचा उद्देश आहे.

लेखनाच्या भूमीवर खरंच काही लेखक असे असतात की त्यांच्या लेखण्या याच त्यांच्या गवताच्या काडय़ा असतात. त्याच्या आधाराने पक्ष्यांप्रमाणे ते आभाळ उंच करून माणसाची मान वर करतात. मी माझ्या लेखणीबद्दल एवढंच सांगेन की, त्या लेखणीने आभाळ उंच, वर करण्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना साथ दिलेली आहे..कोणताही पुरस्कार मिळावा हा साहित्यिकाचा उद्देश नसतो. लोकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचणं हा त्याचा उद्देश असतो. पण जर एखादा पुरस्कार, त्याचा उद्देश पुरा करण्यासाठी उपयोगी ठरला तर त्याचं महत्त्व खूप असतं. खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व असतं. प्रत्येक लेखणीसमोर तिच्या भाषेचं एक सीमित विश्व असतं. हिंदुस्थानमध्ये तर हे विश्व खूपच सीमित आहे. इथल्या भाषांनी तर आपल्या विचारांनाही छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांमध्ये वाटून टाकलंय.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com