कुठल्याही उपयोजन क्षेत्रात पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेकडून (एक्सप्लनेबल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – ईएआय) पुढील गोष्टी अपेक्षित आहेत : पारदर्शकता, विश्वसनीयता, सुटसुटीत स्पष्टीकरण, नियम व अधिनियमांची पूर्तता, वापरलेल्या प्रारूपांची, पद्धतींची आणि निष्कर्षांची वैधता तपासणी आणि दिलेले उत्तर किंवा सल्ला धोकाविरहित असेल हे पाहणे.

मनुष्य कुठल्याही समस्येकडे कसा पाहतो, ती समजून घेतो आणि इतरांची त्याबाबतची मते लक्षात घेऊन आपले मत आणि निर्णय कसे ठरवतो या प्रक्रियेचे शिक्षण पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वापरकर्त्यांच्या संवादांतून कोण काय, कुठे, केव्हा आणि कसे बोलले याची फोड करण्याची क्षमता प्रणालीने आत्मसात करणे हादेखील त्याचा भाग आहे. एकूण रोख अशा प्रणालीच्या विकासात मानवकेंद्रित संरचनेची तत्त्वे समाविष्ट करण्यावर आहे. अशी प्रशिक्षित प्रणाली अधिक उपयुक्त आणि मान्य होईल ही अपेक्षा आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता – संवाद कौशल्य

सोबत जोडलेले दृश्य अशा प्रणालीच्या वापराचे उदाहरण म्हणून बघता येईल. त्यात एका कलाकाराने काढलेल्या चित्राबाबत यंत्रमानव आपला स्वतंत्र दृष्टिकोन, समीक्षण किंवा अर्थ प्रेक्षकाला सांगत आहे. ही यंत्रमानवाच्या आकलन आणि अर्थयुक्त संवाद करण्याच्या शक्तीची पावती म्हणता येईल. त्या पुढे जाऊन यंत्रमानवच अशी चित्रे काढून त्यांचे प्रदर्शन घडवू शकेल; त्याबाबत भाष्य करू शकेल हे नाकारता येणार नाही.

पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अस्तित्वात येऊन जेमतेम एक दशक होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तिच्या उपयोजनांची उदाहरणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. मात्र कोविड-१९ ची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या अनेक वैद्याकीय प्रयत्नांना पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्याने लक्षणीय यश प्राप्त झाल्याचे दाखले देणारे शोधलेख प्रसिद्ध झाले आहेत. रुग्णांची प्राप्त महाकाय संख्यात्मक वैद्याकीय माहिती आणि चित्रांकनातून (स्कॅन्स) अशा प्रणालींनी कुठल्या प्रकारची प्रारूपे रचून आणि विश्लेषण करून अगदी वेगळे निष्कर्ष काढले याचे स्पष्टीकरण मिळालेले आढळते. त्यामुळे वैद्याकीय उपचार आणि रुग्णांची शुश्रूषा-सेवा अधिक सखोल आणि प्रभावी करण्यास मदत मिळाली. त्याचसोबत निदान व उपचारांबाबत असलेले काही पूर्वग्रह दूर होणे, नैतिकता पाळणे आणि नियमांची पायमल्ली टाळणे याची हमी मिळत आहे. सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला हा पारदर्शी घटक जोडल्याने मानवी आकलन आणि निर्णय घेणे किती अधिक प्रमाणात प्रभावी होते, याबाबतही संशोधन सुरू आहे.

डॉ विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org