कविता, कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक, सांगीतिका, बालसाहित्य, चरित्र, निबंधसंग्रह, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारात ‘कुवेंपु’ यांनी दर्जेदार, विपुल लेखन केलं आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे त्यांनी लिहिली. अनेक निबंधसंग्रह व समीक्षात्मक ग्रंथ लिहिले. असं चौफेर विपुल लेखन त्यांनी केलं आहे. पण तरीही ‘कवी कुवेंपु’ म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर, प्राचीन कन्नड शब्द अधिक आढळतात. ‘चित्रांगदा’ व ‘श्रीरामायणदर्शनम्’ (१९४९) ही दोन महाकाव्ये त्यांनी लिहिली आहेत.
‘श्रीरामायणदर्शनम्’ हे २३,००० ओळींचे महाकाव्य आहे. यामागे दहा वर्षांची ज्ञानसाधना आहे. या महाकाव्यासाठीच कुवेंपु यांना १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९२०च्या सुमारास कॉलेज जीवनातच पुटप्पांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला होता. त्यांचे एकंदर ३५ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले असून, ‘कोळुलु’ (बासरी) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यात देव, निसर्ग, भवतालचा परिसर या सर्वाविषयी असणारी ओढ व्यक्त झाली आहे- ते म्हणतात:
‘‘तुंबेमध्ये डुंबत असता, लाटांमधुनि नाचत येऊनि
चुंबिलेस तू माझ्या गाला, गे सुंदर कविते।’’
‘कोळुलु’, ‘नविलु’ (मोर), ‘पांचजन्य’, ‘चित्रांगदा’, ‘कलासुंदरी’, ‘षोडशी’, ‘अग्रिहंस’ इ. काव्यसंग्रहात त्यांची भावगीते, कथनकवने व आध्यात्मिक गीते प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या अनेक गीतांमध्ये निसर्गभक्ती आणि ईश्वरभक्ती दिसते. नादमय शब्दात निसर्गाची रमणीय चित्रे रेखाटलेली दिसतात. निसर्गाविषयी त्यांचा दृष्टिकोन पूजक भक्ताचा आहे.
कलाप्रेम, देश, राष्ट्राविषयी अभिमानही त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसतो. ‘कोगिले मत्तु सोव्हिएट रशिया’सारख्या कवितेत आधुनिक भारतीय समाजाचे प्रतिबिंब दिसते ‘चित्रांगदा’ हे ‘कुवेंपु’चे कथनकाव्य आहे. पण एकूणच त्यांच्या कवितेवर प्राचीन काव्याचा प्रभाव दिसतो. क्वचित क्रांतीचा घोष, विज्ञानाचा ध्वनीही ऐकू येतो. तसंच भारतीय वेदान्त व संस्कृतीचे सारही त्यांच्या काव्यात दिसते.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
तोलन मौल्यवान धातूंचे
सोने, चांदी आदी मूल्यवान धातू यांचे वजन दर्शवणारी अनेक परिमाणे फार पूर्वीपासून प्रचलित आहेत. त्यांची कोष्टके विविध भागांत वेगवेगळी होती. उदाहरणार्थ महाराष्ट्रात, ८ गुंजा = १ मासा, १२ मासे = १ तोळा आणि २४ तोळे = १ शेर, किंवा (३+१/३) वाल = १ मासा आणि ४० वाल = १ शेर अशी मापन पद्धती बराच काळ वापरात होती.
फार प्राचीन काळी आपल्याकडे अगदी शुद्ध असलेल्या सोन्यास बावन्न कशी सोने म्हटले जात असे. मात्र त्यात काही प्रमाणात भेसळ असल्यास ५० कशी (२ भाग भेसळ) किंवा ४७ कशी (५ भाग भेसळ) अशा प्रकारे त्याची प्रत केली जायची.
त्यानंतरच्या व्यवस्थेत सोने पूर्णपणे शुद्ध असल्यास त्यास १०० नंबरी म्हणू लागले. मात्र सोन्याचे अलंकार टिकण्यासाठी त्यात काही अंश तांबे (हीन धातू) मिसळले जात असे. अशा मिश्रणाच्या जर १०० भागांपकी ९६ भाग शुद्ध सोने आणि ४ भाग हीन धातू असल्यास, त्या मिश्रणास ९६ नंबरी सोने असे संबोधन होते.
पुढे इंग्लंडमधील शुद्ध सोने कॅरटने मोजण्याची पद्धत अधिक मान्य पावली. या पद्धतीत शुद्ध सोन्यास २४ कॅरट सोने म्हणतात. २४ भागांपकी ४ भाग हीन धातू असल्यास ते सोने २० कॅरटचे आहे असे म्हटले जाते. पूर्वी इंग्लंडच्या एक पौंडच्या चलनी नाण्यात २२ भाग शुद्ध सोने असे, त्यामुळे त्या नाण्यास २२ कॅरट शुद्ध म्हणत. इथे कॅरट हा शब्द ‘भाग’ याअर्थी वापरला जातो, वजन या अर्थाने नव्हे.
मात्र हिऱ्यासारख्या जवाहिरांचे वजन कॅरट या मापनाने केले जाते. त्याचे कोष्टक : (३+१/६)ग्रेन = १ कॅरट, तर २४ ग्रेन = १ पेनिवेट, २० पेनिवेट = १ औंस आणि १२ औंस = १ पौंड.
आता मेट्रिक पद्धतीप्रमाणे बहुमोल धातू ग्रॅम या वजनात मोजले जातात. भारतीय प्रमाणीत पद्धतीप्रमाणे १ तोळा = ११.६६३७५ ग्रॅम आणि १ शेर (८० तोळे) = २.०५७ पौंड = ०.९९३१० किलोग्रॅम अशा कोष्टकांनी जुन्या आणि आधुनिक वजन मोजणी पद्धती जोडलेल्या आहेत.
– डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org