डॉ. श्रुती पानसे
जन्मत:च माणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना असते. भूक लागली की मूल रडतं. तेव्हा आपल्याला भूक लागली आहे, हे त्याला माहीत नसतं. काही तरी चुकीचं घडतंय, मी सुरक्षित नाही, ही भावना असते. ओळखीचे चेहरे, आवाज, स्पर्श यांबाबतीत सुरक्षित वाटतं. अनोळखी चेहरे, अचानक खूप माणसं भेटणं, प्राणी, अनोळखी घर, नवं वातावरण यांमुळे असुरक्षित वाटून मुलं रडतात. पहिल्या काही महिन्यांमध्ये कोणाच्याही कडेवर जाणारं बाळ नंतर मात्र अनोळखी माणसांकडे जायला घाबरतं. तिथून ओळखीच्या आणि सुरक्षित हातांमध्ये जाण्यासाठी रडतं, धडपडतं.
असुरक्षिततेची भावना नैसर्गिक आहे. पण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही, तर काही नकारात्मक भावना यातून निर्माण होतात. नराश्य, राग, भीती, मत्सर अशा भावनांच्या मुळाशी असुरक्षितता असते. या सर्व भावना वेगवेगळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त होतात.
उदाहरणार्थ, बसमध्ये/ रेल्वेमध्ये जागेवरून माणसं एकमेकांशी भांडतात. त्यावेळी ती रागाची भावना आहे असं वाटलं; तरी मुळात- मला बसायला जागा हवी आहे, ती मिळाली नाही तर काय, ही असुरक्षिततेची भावना मनात असते. ही भावना रागातून व्यक्त होते.
रागाच्या पुढची पायरी म्हणजे हिंसा. याची अनेक रूपं, वेगवेगळ्या छटा दिसून येतात.. दुसऱ्यावर हात उगारणं, दादागिरी करणं, गुंडगिरी करणं, वगैरे. या भावना कमी करायच्या असतील तर मुळातली भावना कमी करावी लागेल.
संतापी, हिंसक माणसं असली की घर चिडीचूप होऊन जातं. पूर्वी संताप व्यक्त करणं ही बहुतेक ज्येष्ठ व्यक्तींची मक्तेदारी होती. पण आता सर्व वयाची माणसं खूप चिडचिड करतात. वास्तविक या रागभावनेचं नियोजन लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. कारण ही भावना माणसाला कुठेही भडकावते. त्यात आपली तार्किकतेची शक्ती पूर्ण नष्ट होऊन जाते. अगदी थोडक्यासाठी रागीट माणसावर कसले कसले शिक्के बसतात. त्यानं आजवर केलेल्या बऱ्या कामांवर पाणी पडतं. दुसरीकडे ज्याला त्यानं दुखावलेलं आहे, ती व्यक्ती हे जन्मात कधी विसरू शकत नाही. माणसं काहीही विसरतात; पण आपला ‘इगो’ दुखावला गेला तर ते विसरू शकत नाहीत. म्हणून या भावनांचा उद्रेक व्हायला नको, ही काळजी घ्यायला पाहिजे.
contact@shrutipanse.com