आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या आजूबाजूला भटकी कुत्री, मांजरी, गुरेढोरे, चिमण्या-कावळे, फळझाडे-फुलझाडे, फुलपाखरे, माश्या, भुंगे, मधमाश्या, गांधीलमाशा.. असे अनेक सजीव घटक अगदी सहजपणे दिसतात. आपल्या दृष्टीला बाह्य़ शारीरिक लक्षणांवरून दोन मांजरी किंवा दोन कुत्री अथवा जास्वंदाची दोन झाडे सारखीच तर आहेत असे दिसेल. परंतु ज्यांची ‘नजर’ तयार आहे अशा जीवसृष्टीच्या अभ्यासकांना, संशोधकांना मात्र वरवर अगदी सारख्या दिसणाऱ्या, एकाच जातीच्या प्राण्यांच्या अथवा वनस्पतींच्या बाह्य़ लक्षणांमध्येसुद्धा विविधता दिसते. आणखी थोडा विचार करून पाहा.. माणसाच्या प्रजातीमध्येही विविधता असतेच की! अगदी एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, त्यांचे आई-वडील यांच्यात तरी कुठे साम्य असते? याचाच अर्थ असा की, पृथ्वीच्या जीवावरणाचा अविभाज्य घटक असलेल्या सजीवांच्या बाह्य़ लक्षणांमध्ये कमालीची विविधता आढळून येते.

परंतु या विविधतेतसुद्धा एकता आहे ही खूपच आश्चर्याची बाब आहे. आपल्या अवतीभोवती असणारे अतिसूक्ष्म जिवाणू ते विविध आकारांचे, लहान-मोठे/महाकाय प्राणी, वनस्पती आणि माणूस हे सगळेच ‘सजीव’ आहेत. कारण या सगळ्यांची शरीरांतर्गत मूलभूत लक्षणे एकसारखीच आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्याही इमारतीचा मूलभूत ढाचा हा विटांचा बनलेला असतो; त्याप्रमाणे प्रत्येक सजीवाच्या शरीराचा मूलभूत ढाचा म्हणजे ‘सेल्स’ अर्थात पेशींचा बनलेला असतो. या पेशी सर्व प्रकारच्या शारीरिक क्रिया-प्रक्रिया घडवून आणतात. या मूलभूत ढाच्यातदेखील विविधता आहेच. सर्व प्रकारचे जिवाणू आणि आता जगप्रसिद्ध झालेल्या करोनासारखे अब्जावधी विषाणू (विषाणू हे ‘निर्जीव’ आणि ‘सजीव’ यांच्यामधल्या ‘कुंपणावर’ बसलेले संधिसाधू आहेत!), त्याचप्रमाणे शैवाल गटातील काही प्रजाती तसेच असंख्य सूक्ष्म परजीवी यांचे ‘शरीर’ केवळ एकाच पेशीचे बनलेले असते. ही एकच पेशी विविध प्रकारच्या जीवनक्रिया सातत्याने करत असते. इतर सर्व प्राणी व वनस्पतींचे शरीर मात्र असंख्य पेशींचे बनलेले असते. प्रत्येक विशिष्ट जीवनक्रिया या पेशींच्या समूहाद्वारे केली जाते. शेवटी ‘विविधता में एकता, यही है जीवसृष्टी की विशेषता’ असे म्हणता येईल!

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

Story img Loader