बारीक कांडी, लुसलुशीत पाने, जलद वाढ, भरपूर चारा याबरोबरच जनावरेही आवडीने खात असल्यामुळे आज मारवेल चारा पिकाखालील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. हा चारा काढण्यासाठी कमी मजूर लागतात तसेच यंत्राद्वारे चांगल्या पद्धतीने कापणी करता येते. चॉफ कटरचा वापर न करता खाऊ घातले तरी चारा वाया जात नाही.
कमी पाण्यामध्ये तसेच हलक्या जमिनीत लागवड करण्यासाठी स्टायलोचा वापर करावा. स्टायलो द्विदल वर्गातील बहुवर्षीय चारा पीक असून त्यामध्ये १२ ते १३ टक्के प्रथिने असतात. पावसाच्या पाण्यावर या पिकाची वाढ होऊन पाणी नसताना खोडे जिवंत राहतात. तसेच पडलेले बीसुद्धा पुढील वर्षी पडलेल्या पावसात उगवते. अशा प्रकारे काहीही खर्च न करता पडीक जमिनीत स्टायलोचा चारापीक म्हणून उपयोग होतो. हिरव्या चाऱ्याबरोबरच वाळलेला चारा जनावरांना देणे महत्त्वाचे असते. दररोज गायीला १५ ते २० किलो हिरवा चारा, पाच ते आठ किलो वाळलेला चारा द्यावा. तसेच दुधाळू गायींना दुधाच्या ४० टक्के खुराक (खाद्य) द्यावा. यामुळे गायीचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनही चांगले होते. अनेकदा शेतकऱ्यांची अडचण असते ती वाळलेल्या चाऱ्याची. ज्वारीचा कडबा आज मिळणे अवघड झालेले आहे. अर्थात त्यासाठी नियोजन केले तर ज्वारी, ओट, कांडी गवत, घास ज्या वेळी जास्त असते त्या वेळी ते वाळवून कडबाकुट्टीतून बारीक करून ठेवले तर गरजेनुसार वर्षभर वापरता येते. तसेच गहू, हरभरा, सोयाबीनचे भूसही कोरडा चारा म्हणून वापरता येईल.
दूध उत्पादन करत असताना वर्षभर लागणारा वाळलेला चारा तसेच भुस्सा साठवून ठेवण्यासाठी सोय करावी. विविध पिकांचे भूस एकत्र करून वापरले तर जनावरे आवडीने खातात. विशेषत: हिरवा चारा कडबाकुट्टी यंत्रामधून काढल्यानंतर त्यामध्ये कोरडय़ा चाऱ्याची कुट्टी / भुस्सा एकत्र केला तर जनावरे आवडीने खातात. तसेच त्यांचे रवंथही चांगले होते. जनावरांना उसाचे वाढे जास्त खाऊ घालतात, हे जनावरांच्या दृष्टीने घातक आहे. उसाच्या चाऱ्यामध्ये ऑक्झिलेटचे प्रमाण जास्त असते. याचा शरीरातील कॅल्शियमबरोबर संयोग होऊन कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे देखे रवी.. – अणूंची गोष्ट
एका प्रथितयश नियतकालिकाच्या जडवादी संपादकाशी माझे एकदा वाजले. मुद्दा होता विश्वाच्या मुळाशी काय आहे असा. तेव्हा मी अणूचे स्वरूप काय असा शोध घेतला आणि अशी समजूत झाली की अणूला भिंती नसतात, ते केवळ एक क्षेत्र असते.  एका अणूचे क्षेत्र एका मोठय़ा सभागृहाएवढे आहे असे गृहीत धरले तर त्याचे केंद्रक एका आंब्याएवढे असते. त्याला प्रोटॉन म्हणतात आणि ‘मोठे सभागृह / आंबा’ या प्रमाणाचे उदाहरण पुढे चालविल्यास, घेतल्यास त्या केंद्रकाच्या आजूबाजूला चिट किंवा डासाच्या आकाराचे इलेक्ट्रॉन फेऱ्या मारतात. हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. काही मूलद्रव्यांत एकाहून अधिक असतात. त्यांचा ठावठिकाणा लावणेही अवघडच. कधी कधी हे कण असतात, कधी कधी तरंगांसारखे बागडतात. हे केंद्रकापासून कोठल्या परिघात फिरणार याचा अदमास घेता येत नाही. हे फेऱ्या मारतात तेव्हा प्रकाशकण नावाची एक अद्भुत चीज आहे.. तो प्रकाशकण जर यांच्यावर आदळला तर हे मोठे उत्तेजित होऊन लांब उडी मारून केंद्रकापासून दूरवरच्या परिघात चकरा मारू लागतात. अणूच्या एका क्षेत्रातली ही हलचल. विश्वात सोडा, पृथ्वीही जाऊदे, आपल्या शरीरातल्या अणूंची संख्या लिहिण्यास अनेकानेक शून्ये वापरावी लागतात. भिंती नसलेली, सतत हलणारी ही ऊर्जास्वरूप क्षेत्रे ‘जड’ म्हणायला मला जड गेले, ते यामुळे.
म्हणून मग शेवटी ज्ञानेश्वरी उघडली तर त्यात आठव्या अध्यायात काही ओव्या सापडल्याच. त्याही ऊर्जेकडेच बोट दाखवत होत्या. ‘गगनाहूनही जुने। परमाणुहूनही लहाने ।ज्याच्या सान्निध्याने। विश्व चळे ॥ आकाराविना असणे।  जन्ममृत्यूचे संपणे । ज्याच्यातच सगळे । जगते॥ हेतू आणि तर्काच्या पलीकडले। डोळय़ांना दिवसा न दिसे । सूर्यकणांचे उत्तम सडे । ज्याला अस्त ना घडे । ज्ञानियांना। सूर्योदया आधीचे। तांबडे॥’ अशा अर्थाचे, तेराव्या शतकातले द्रष्टे कवित्व म्या पामराची समजूत घालू शकले.
चैतन्यच खरे. त्याची तात्कालिक नामरूपे येतात आणि जातात, त्या इलेक्ट्रॉनसारखी. त्यांना त्यांच्याजागी ठेवून आपण कालक्रमणा करावी हेच भले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – व्यसने कोणी करावी? कोणी करू नये!  – ३
जी मंडळी झोपेकरिता किंवा चिंता दूर व्हावी म्हणून किंवा दु:ख विसरण्याकरिता मद्यप्राशन करू इच्छितात त्यांनी शतधौतघृत झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना जिरवावे; नाकात दोन थेंब टाकावे. स्वत:च्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणताही विषय किंवा वर्तमानपत्रांतील बातमी डोळ्यासमोर आणावी; चटकन झोप लागते. गरज पडली तर निद्राकर वटी सहा गोळ्या झोपताना घ्याव्या. शांत झोप येण्याकरिता आणखी दोन उपाय म्हणजे सायंकाळी लवकर व कमी जेवण करावे. जेवणानंतर किमान वीस ते तीस मिनिटे फिरून यावे.
झोपेची सबब सांगून कदापि मद्य घेऊ नये. कारण प्रथम मद्य आपले ताब्यात असते; कालांतराने आपण मद्य वा या व्यसनांच्या ताब्यात जातो.
बिडी, सिगारेट पिणाऱ्यांकरिता माझा एक सांगावा असा असतो की, ‘‘त्या’’ नालायकाची संगत सोडा, कारण तो तुम्हाला बिडी, सिगारेट देईल; तुझ्याकडे माचिस आहे का म्हणून विचारेल. म्हणून त्याची संगत सोडा!’’ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांना याचप्रकारे सांगावे लागते की, ‘त्या नालायकाची संगत सोडा; तो तुम्हाला तुझ्याकडे चुना आहे का, म्हणून तंबाखूची डबी दाखवेल.’
 मशेरी, तंबाखू, बिडी, सिगारेट या व्यसनाधीन माणसांनी उष्णतेच्या त्रासाची तक्रार केली की, त्यांचे तोंड, जीभ, गाल, ओठ, पाहून; तुम्हाला तोंडाचा, जिभेचा, गालाचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे असे सांगावे लागते. मधुमेही विकाराच्या रुग्णांना तुमची दृष्टी जाईल, गँगरिन होईल, पाय कापावा लागेल, अशी भीती दाखवावी लागते. मूत्रपिंडाच्या किंवा लघवीच्या तक्रारीसंबंधित रुग्णांना सी.आर.एफ – क्रॉनिक रिनल फेल्युअरची भीती दाखवावी लागते.
एक अनुभव – रोज कॅप्स्टन सिगारेट पिणाऱ्या पाकिटातील एका सिगारेटचे दोन तुकडे करून सिगरेट प्यावयास परवानगी दिली. पुढच्या आठवडय़ात सिगारेटऐवजी बिडय़ा दिल्या. तिसऱ्या आठवडय़ात व्यसन सुटले.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  ३ ऑगस्ट
१९६३ > बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म. ‘एस्तेर राज्ञीचरित्र’, ‘दानिएकलचे मानसिक धैर्य’ या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे. संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली.
१८७७ > कवी, काव्यसमीक्षक व भाषंतरकार श्रीकृष्ण नीळकंठ चाफेकर यांचा जन्म. सुनीत, गज्मल हे काव्यप्रकार मराठीत कसे यावेत याविषयी त्यांनी विचार मांडले, काव्यलेखनही केले व ‘सरस्वतीचंद्र’ या गुजराती कादंबरीचे मराठी रूपांतर केले.
१९३० > ज्योर्तिगणितज्ञ व लेखक व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. ज्योतिषगणिताविषयी त्यांनी ग्रहगणित, शास्त्रशुद्ध पंचांगअयनांश निर्णय, नक्षत्रविज्ञान, केतकी परिमल भाष्य आदी पुस्तके लिहिली, शिवाय ‘पंचांगोपयोगी कारणग्रंथ’ मराठी व संस्कृतमध्ये लिहिला.
१९३३ > पुरातत्त्व संशोधक आणि प्राचीन मंदिर व मूर्तिशास्त्राचे जागतिक दर्जाचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर यांचा जन्म. या विषयावर त्यांनी ‘मराठवाडय़ाचा सांस्कृतिक इतिहास’, ‘महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य व शिल्प’, बिंबब्रह्मा अथवा वास्तुपुरुष, देवगिरी, सूरसुंदरी हे ग्रंथ लिहिले.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal fodder planning