‘युरेका’ हा शब्द ऐकला, वाचला की आठवण येते ती आर्किमिडीज या प्रतिभावंत ग्रीक गणितज्ञ आणि तंत्रज्ञाची. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या या प्रज्ञावंताच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. सिराक्युसचा राजा हिरो याने एक सोन्याचा मुकुट तयार करून घेतला होता. पण या सोन्याच्या मुकुटात चांदीची भेसळ केली असावी, अशी शंका राजाच्या मनात आली. हे कोडे उलगडण्याची जबाबदारी राजाने आíकमिडीजवर सोपवली. मुकुट न वितळवता तो शुद्ध सोन्याचा आहे का हे तपासणे तसे अशक्य वाटणारे.. आíकमिडीजने त्यावर विचार करणे सुरू ठेवले. एक दिवस आंघोळ करण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये आíकमिडीजने पाय टाकला, तेव्हा त्यातून बाहेर सांडणाऱ्या पाण्याकडे पाहताच आíकमिडीजला राजाच्या प्रश्नावर उपाय सुचला. अतिशय आनंदित झालेला आíकमिडीज ‘युरेका, युरेका’ म्हणत अंगावर पुरेसे कपडे नाहीत, याचे भान न राहता तसाच राजदरबारात धावत गेला.

चांदीच्या व सोन्याच्या ठोकळ्याची घनता वेगवेगळी असल्याने, त्यांच्या एकाच वजनाच्या ठोकळ्याचे आकारमान वेगवेगळे असते. (चांदीचे जास्त तर सोन्याचे कमी !) आता पाण्याने पूर्ण भरलेल्या भांडय़ात आíकमिडीजने मुकुटाच्या वजनाएवढय़ा वजनाचा शुद्ध सोन्याचा ठोकळा बुडवला. ठोकळा बुडवल्याने त्याच्या आकारमानाइतके पाणी भांडय़ातून बाहेर सांडले. हाच प्रयोग आíकमिडीजने तेवढय़ाच वजनाचा चांदीचा ठोकळा घेऊन आणि त्यानंतर मुकुट घेऊन केला. मुकुट पाण्यात बुडवल्यावर बाहेर सांडलेल्या पाण्याचे आकारमान हे सोन्याचा किंवा चांदीचा ठोकळा पाण्यात बुडवल्यावर बाहेर सांडलेल्या आकारमानाच्या दरम्यानचे असल्याचे आढळले. यावरून मुकुट शुद्ध सोन्याचा नसून त्यात चांदीची भेसळ करण्यात आली असल्याचा अचूक निष्कर्ष आíकमिडीजने काढला.

आíकमिडीजचे सुप्रसिद्ध तत्त्व याच तथाकथित प्रयोगानंतरच्या चिंतनातून तयार झाले. आíकमिडीजचे हे तत्त्व म्हणजे ‘जेव्हा एखादी वस्तू द्रवात बुडवली जाते, तेव्हा त्याच्या वजनात जी घट येते, ती घट बाहेर सारलेल्या द्रवाच्या वजनाएवढी असते’ हे तत्त्व तरंगणाऱ्या वस्तूलाही लागू होते. तरंगणाऱ्या वस्तूच्या बाबतीत, त्या वस्तूने बाजूला सारलेले पाणी हे त्या वस्तूच्या स्वतच्या वजनाइतके असते. त्यामुळे एखादी जड धातूची वस्तू तरंगवायची असेल, तर तिचा आकार असा बनवायचा की त्या आकारामुळे आपल्या वजनाइतके पाणी ती बाजूला सारेल!

– हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org