फ्लोरेन्सच्या जगप्रसिद्ध सान्ता मारिया डेल फिओर कॅथ्रेडलच्या (‘डय़ुओमो’च्या), विटांनी बनविलेल्या प्रचंड मोठय़ा घुमटाच्या कारागिरीमुळे फिलिपो ब्रुनेल्शी जगप्रसिद्ध झाला. युरोपियन प्रबोधनकाळातील अथवा पुनरुज्जीवनकाळातील असाधारण कलाकारांपकी, वास्तुविशारदांपकी फिलिपो होता. १३७७ साली फ्लोरेन्स येथे जन्मलेला फिलिपो मूळचा कुशल सोनार. फिलिपो ब्रुनेल्शी (इ.स. १३७७ ते १४४६) हा फ्लोरेन्सचा कलाकार लिओनार्दो दा व्हिचीप्रमाणेच अनेक क्षेत्रांतील आपल्या बहुआयामी कर्तृत्वाने, कारागिरीने अजरामर झाला आहे. सुवर्ण कारागिरीशिवाय फिलिपोने वास्तुकला, गणित आणि अभियांत्रिकी, चित्रकारिता, जहाज बांधणी, नगररचना इत्यादी अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय काम करून ठेवले आहे. तरुणपणी प्रथम फिलिपोने रेशीम व्यापाऱ्यांच्या गिल्ड म्हणजे संघटनेत आपले काम सुरू केले. या सिल्क र्मचट्स गिल्डच्या कचेरीसाठी इमारत बांधणीचे केलेले काम हे फिलिपोचे पहिले कर्तृत्व. फिलिपोने अनेक उत्तमोत्तम वास्तुरचना तयार केल्या; परंतु ‘कॅथ्रेडल डी सांता मारिआ फियोरे’ या कॅथ्रेडलवरील त्याने बांधलेल्या प्रचंड घुमटामुळे त्याला जागतिक प्रसिद्धी मिळाली. या घुमटामुळे सांता मारिया कॅथ्रेडल हे फ्लोरेन्सचे सध्या प्रतीक बनलेय. १२९६ ते १४३६ अशी १४० वष्रे बांधकाम चाललेल्या या चर्चच्या घुमटाचे काम १४२० ते १४३६ अशी १६ वष्रे चालले होते. चर्चचा मूळ आराखडा अर्नोल्फो डी कॅम्बिओ याने १२९४ साली तयार केलेला होता. या आराखडय़ातील घुमट अर्धगोलाकृती पण अष्टकोनी होता. १४१८ मध्ये घुमटाशिवाय सर्व इमारत बांधून तयार झाली. घुमटाचा आराखडा तयार करून त्याचे बांधकाम करण्याची स्पर्धा नगर प्रशासकांनी ठेवली. या स्पध्रेतून फिलिपो ब्रुनेल्शीची निवड झाली. फिलिपोने घुमट अर्धगोलाकृतीऐवजी उभट, लंबगोलाकृती करून त्याची उंची ८१ मीटर तर रुंदी ३७ मीटर ठेवली. संपूर्ण विटांमध्ये बांधलेला हा घुमट जगातील तत्कालीन घुमटांमध्ये सर्वाधिक मोठा होता. पुढे मायकेल अॅन्जेलोने बांधलेला रोममधील सेंट पीटर्सचा घुमट यापेक्षा मोठय़ा आकाराचा आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
दुआबंगा
प्रस्तुत लेखात अपरिचित वृक्षांचा परिचय करून देणार आहे. या वृक्षास आपण दुर्मीळ म्हणूनही संबोधू शकतो, पण ते टाळण्याचे कारण दुर्मीळ म्हणल्यावर ते दुर्मीळ कुठे? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यासाठी स्थाननिर्देश होणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्रात व इतरही ठिकाणी वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचत आहे. लेखामालेला आखलेल्या काही मर्यादांचा विचार करता अनेक स्थानांचा निर्देश करण्याचा प्रयत्न असेल. दुआबंगा एक पानगळी वृक्ष आहे. याची उंची साधारण १२ मीटपर्यंत वाढते. फांद्या सर्वसाधारण खाली लोंबकळणाऱ्या आणि लांब असल्याने वृक्ष काही वेगळाच दिसतो. या वृक्षाचे नाव दुआबंगा. फ्रांसिस हेमिल्टन यांनी त्रिपुरा येथील स्थानिक नाव दुआबंगा यावरून घेतले आहे. लोंबकळणाऱ्या फांद्यांवर लांब मान म्हणून कदाचित या वृक्षाला लांम्पाते से म्हणतात. पाने वरून गडद हिरवी असतात. या वृक्षास एप्रिल महिन्यात फुले येतात. साधारण ५-६ सेंमी आकाराची फुले असलेला तुरा पानांच्या बेचक्यातून उगवतो. फुले पांढऱ्या रंगाची असून त्यास न भावणारा गंध असतो. फळे साधारण त्रिकोणी आकाराची असतात. शास्त्रीय भाषेत या वृक्षाचे नाव ‘दुआबंगा ग्रॅडीफ्लोरा’ असे आहे. सरळसोट वाढतो म्हणून याचा उपयोग ितबर म्हणून केला जातो. आसाम, सिक्किम या ठिकाणी हा वृक्ष प्रामुख्याने ओहोळांच्या सान्निध्यात आढळतो. मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, गांधी मेमोरियल परिसरात एक मोठा व दोन लहान वृक्ष आहेत. त्याचप्रमाणे कृष्णगिरी निसर्ग परिचय उद्यानात दुआबंगाचे रोपटे असल्याचा संदर्भ मिळतो. दुआबंगा एक देखणा वृक्ष आहे. या वृक्षाची संपूर्ण वाढ झाल्यावर विस्तार मोठा होतो, पण उंची मध्यमच राहते. म्हणून लागवड करायची झाल्यास जागेची उपलब्धता तपासून लागवड करावी. उद्यानात लागवड केल्यास दुर्मीळ असलेल्या या वृक्षाचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. संजय गांधी उद्यानात पूर्वी एकच वृक्ष होता. आता तीन-चार वृक्ष आहेत म्हणजेच मुंबईत वाढ करणे शक्य आहे. तसेच इतरत्रही उपलब्ध जागेत हा वृक्ष लावल्यास त्याचे अस्तित्व जपले जाईल.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा