सुनीत पोतनीस

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या परदेशी अभिनेत्यांपैकीएक, बॉब ख्रिस्तो होते. युरोपियन वर्ण आणि व्यक्तिमत्त्वाच्या बॉब ख्रिस्तोने त्याच्या बहुतांश चित्रपटांत खलनायकी भूमिका केल्या.

बॉबचे मूळचे खरे नाव आहे रॉबर्ट जॉन ख्रिस्तो. तो मूळचा ऑस्ट्रेलियन, जन्म १९३८ सालचा सिडनी येथील. सिडनी येथील विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवतानाच तो लहानसहान नाटिकांमध्ये अभिनय आणि जाहिरातींसाठी मॉडेलिंग करी. अभिनयाची उपजत आवड असलेल्या बॉबला स्थापत्य अभियांत्रिकीत विशेष स्वारस्य नव्हतेच. मस्कतमध्ये होणाऱ्या एका महोत्सवासाठी मॉडेलिंगचे मोठे काम बॉबला मिळाले होते, पण त्यासाठी आवश्यक असणारे वर्क परमिट त्याच्या हातात पडले नव्हते. पण याच सुमारास त्याच्या वाचनात ‘टाइम’ या मासिकातला मुंबईच्या बॉलीवूडबद्दलचा लेख आला. तो  वाचून प्रभावित झालेला बॉब तडक मुंबईला आला आणि हिंदी चित्रपटात काही संधी मिळवण्याच्या खटपटीला लागला. आणि तशी संधी त्याला मिळालीही, ती नामांकित अभिनेत्री परवीन बाबीच्या ओळखीने.

बॉबला पहिली मोठी संधी दिली संजयखानने त्याच्या ‘अब्दुल्ला’ या सिनेमात प्रमुख खलनायकाची १९८० साली. त्यानंतर बॉब ख्रिस्तोने एकूण २०० चित्रपटांत भूमिका केल्या. त्या होत्या खलनायकी स्वरूपाच्या किंवा सनिकी अधिकाऱ्याच्या. हिंदीशिवाय बॉबने तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम चित्रपटांतूनही भूमिका केल्या. ‘अबदुल्ला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘नमक हलाल’, ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. संजय खानने त्याच्या ‘द ग्रेट मराठा’ या चित्रवाणी मालिकेत बॉबला अहमदशहा अब्दालीची महत्त्वाची भूमिका दिली.२००० साली बॉब ख्रिस्तोने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेऊन बेंगळूरुमध्ये तो कुटुंबासह स्थायिक झाला. बंगलोरच्या गोल्डन पाम हॉटेलमध्ये योग शिक्षक आणि बॉडी फिटनेसचा शिक्षक म्हणून दहा वर्षेबॉबने काम केले. वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने बेंगळूरुमध्ये २०११ साली बॉब ख्रिस्तोचा मृत्यू झाला. बॉबची पत्नी नर्गिस ख्रिस्तो आणि मुले डारियस आणि सुनील बेंगळूरुतच स्थायिक आहेत.

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader