डॉ. राजीव चिटणीस
इ.स.पूर्व सहाव्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञांनी पृथ्वी गोलाकार असल्याचे मानले. ‘ पृथ्वीचा परीघ किती असावा ?’, हा त्यानंतरचा प्रश्न सोडवण्याचे श्रेय एरॅटोस्थेनेस या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक खगोलज्ञाकडे जाते. एरॅटोस्थेनेसने पृथ्वीचा परीघ मोजण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केला. यातले एक ठिकाण होते ते इजिप्तमधील सिएन – म्हणजे आजचे आस्वान. दुसरे ठिकाण होते सिएनच्या बरोबर उत्तरेस असणारे अलेक्झांड्रिया. सिएन येथे दिनांक २१ जूनच्या मध्यान्हीला सूर्य डोक्यावर म्हणजे शिरोबिंदूवर येत असल्याचे एरॅटोस्थेनेसला माहीत होते. सिएन येथे जर जमिनीवर एखादी काठी रोवली, तर या दिवशी मध्यान्हीला तिची सावली या काठीच्या पायावर पडत असे. एरॅटोस्थेनेसने याच दिवशी अलेक्झांड्रिया येथे रोवलेल्या काठीच्या सावलीद्वारे, तिथल्या सूर्याचे मध्यान्हीचे स्थान मोजले. ते शिरोबिंदूपासून ७.२ अंश दक्षिणेकडे असल्याचे त्याला आढळले. दोन्ही ठिकाणच्या, एकाच दिवसाच्या मध्यान्हीच्या सूर्याच्या उंचीत ७.२ अंशांचा फरक असल्याचे स्पष्ट झाले.
सिएन आणि अलेक्झांड्रिया यांमधले अंतर हे त्या काळातील ‘स्टेडियम’ या एककानुसार सुमारे ५,००० स्टेडियम इतके होते. एरॅटोस्थेनेसच्या तर्कशास्त्रानुसार, एकमेकांच्या दक्षिण-उत्तर असणारी अशी दोन ठिकाणे एकमेकांपासून जितकी अधिक दूर, तितका सूर्याच्या जास्तीतजास्त उंचीतला असा फरक अधिक असायला हवा. पृथ्वीच्या पूर्ण परिघाचा विचार केला तर उंचीतला हा फरक एका वर्तुळाइतका म्हणजे ३६० अंशांचा असायला हवा. आताच्या मोजणीनुसार एकाच दिवसाच्या मध्यान्हीच्या सूर्याच्या उंचीतला ७.२ अंशांचा फरक हा ५,००० स्टेडियम इतक्या अंतरामुळे पडला. तेव्हा हा फरक ३६० अंश असण्यासाठी दोन दक्षिण-उत्तर शहरातील अंतर त्याच दिशेने मोजल्यास किती असायला हवे? हे अंतर म्हणजेच पृथ्वीचा परीघ! एरॅटोस्थेनेसच्या या गणितानुसार पृथ्वीचा परीघ हा अडीच लाख स्टेडियम इतका भरला.
एरॅटोस्थेनेसच्या काळात वापरले जाणारे ‘स्टेडियम’ हे एकक म्हणजे नक्की किती अंतर, यात मतभेद आहेत. हे अंतर त्या काळी स्टेडियममधील शर्यतीसाठी वापरल्या जाणाऱ्या अंतराइतके म्हणजे १८० मीटर असल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. यानुसार पृथ्वीचा परीघ हा सुमारे ४५,००० किलोमीटर भरायला हवा. असे असल्यास, एरॅटोस्थेनेसने काढलेला परीघ हा आताच्या स्वीकृत परिघापेक्षा सुमारे बारा टक्क्यांनी अधिक भरतो.
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org