ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधक आणि उद्योजक डेमिस हसाबिस यांचा जन्म २७ जुलै १९७६ रोजी झाला. ते डीपमाइंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळणाऱ्या डेमिस हसाबिस यांनी वयाच्या १३व्या वर्षांत मास्टर स्टॅन्डर्ड गाठले. इंग्लंडच्या अनेक कनिष्ठ बुद्धिबळ संघांचे नेतृत्व आणि नंतर केंब्रिज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे शिक्षण लंडनमधील ख्राइस्ट कॉलेज, फिंचले येथे झाले. केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स ट्रायपोस पूर्ण करून डबल फर्स्टसह पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ संगणक गेम डिझायनर, गेम डेव्हलपर, गेमसाठी लीड एआय प्रोग्रामर म्हणून काम केले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून त्यांनी २००९ साली ‘संज्ञानात्मक न्यूरोसायन्स’ या विषयात पीएच. डी. मिळवली.

डेमिस हसाबिस यांनी न्यूरोसायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर संशोधन सुरू ठेवले. मानवी जीवनातील कल्पनाशक्ती, स्मृती आणि स्मृतिभ्रंश अशा विषयांत संशोधन करून त्याबाबतचे लेख नेचर, सायन्स, न्यूरॉन अशा मान्यवर जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले. स्मृतिभ्रंश झालेला रुग्ण स्वत:ला कल्पनेतही नवीन अनुभवांमध्ये पाहू शकत नाही. मात्र कल्पनेची रचनात्मक प्रक्रिया आणि दैनंदिन घडामोडींची स्मृती पुन्हा स्मरणात येण्याची (एपिसोडिक मेमरी रिकॉलची)   पुनर्रचनात्मक प्रक्रिया यांच्यातील दुवा हसाबिस यांनी स्थापित केला. त्यांनी एपिसोडिक मेमरी प्रणालीचे नवीन सैद्धांतिक दालन उघडले. नंतर त्यांनी ‘मनाचे सिम्युलेशन इंजिन’ या कल्पनेला पुढे नेण्यासाठी या संशोधनाचा विस्तार केला.

हेही वाचा >>> कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त

हसाबिस हे मशीन लर्निग आणि एआय स्टार्टअप असलेल्या डीपमाइंडचे सीईओ आणि सहसंस्थापक आहेत. डीपमाइंडचे ध्येय – सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे हे आहे. डीपमाइंड गूगलकडे गेल्यापासून कंपनीने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींत यश मिळविले. डीपमाइंड कंपनीने सखोल अध्ययन (डीप लर्निग) या तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. हसाबिस यांनी स्थापन केलेली आयसोमॉर्फिक लॅब्स लिमिटेड ही औषध शोध (ड्रग डिस्कव्हरी) कंपनी औषधशोधासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचे कार्य त्याच्या संरचनेवर अवलंबून असते. डीपमाइंडच्या आल्फाफोल्ड तंत्रज्ञानाने ४३ पैकी २५ प्रथिनांसाठी सर्वात अचूक रचनेचा यम्शस्वी अंदाज केला. हसाबिस यांना अल्फाफोल्डवरील कामासाठी ब्रेकथ्रू पुरस्कार, मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी लास्कर पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डेमिस हसाबिस यांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातीसाठी सर्वात फायदेशीर तंत्रज्ञानापैकी एक असेल.

– डॉ. सुनंदा ज. करंदीकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about entrepreneur and ai researcher demis hassabis zws
Show comments