१९३५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हंटरवाली’मधील, चेहऱ्यावर मुखवटा आणि काळा अंगरखा घातलेली धाडसी कृत्ये करणारी नायिका अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. या नायिकेचे काम करणारी अभिनेत्री नादिया ऊर्फ फिअरलेस नादिया ही जन्माने ऑस्ट्रेलियन होती हे बहुधा अनेकांना माहिती नसावे. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या अगदी सुरुवातीच्या अभिनेत्रींपकी फिअरलेस नादिया होत्या.

फिअरलेस नादियांचे मूळचे नाव मेरी अ‍ॅन इव्हान्स. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथला, १९०८ सालचा. वडील हर्बर्ट इव्हान्स हे स्कॉटिश आणि आई मार्गारेट ही ग्रीक. वडील ऑस्ट्रेलियात ब्रिटिश लष्करात नोकरीला होते. मेरी पाच वर्षांची असताना तिच्या वडलांची बदली मुंबईला झाली आणि हे कुटुंब मुंबईला १९१३ मध्ये आले. पुढे वडलांची बदली तत्कालीन वायव्य सरहद्द प्रांतात पेशावर इथे झाल्यावर मुंबईत स्थायिक झालेलं हे इव्हान्स कुटुंब पेशावरमध्ये राहावयास गेलं. मेरी तशी मुळातली धाडसी आणि बेडर. पाचव्या- सहाव्या वर्षी इतर मुली बाहुल्यांबरोबर खेळत तर मेरी घरातल्या पाळीव घोडय़ाबरोबर खेळत असे. त्याच्यावर जाऊन बसत असे! किडे, िवचू पकडणे हा पण तिच्या खेळाचा भाग होता. तिचं शालेय शिक्षण पेशावरमधल्याच एका शाळेत झाले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर मेरीचे वडील ब्रिटिश लष्करातून जर्मनांविरुद्ध लढण्यास मध्यपूर्वेत गेले. हे युद्ध संपता संपता मेरीचे वडील जर्मनांकडून मारले गेले. मेरीच्या आईने मग पेशावरमध्येच किरकोळ नोकरी करीत घरखर्च भागविणे सुरू केले.

मेरीच्या शालेय जीवनात तिला नृत्य संगीताचीही आवड होती. वडिलांकडून स्कॉटिश नृत्य आणि आईकडून ग्रीक गायन शिकून ती चर्चमधल्या समूह गायन चमूत भाग घेई. हरहुन्नरी मेरी तिच्या विसाव्या वर्षांपर्यंत घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, मासेमारी, नेमबाजी, तारेवरची कसरत, पोहणे यांसारख्या अनेक गोष्टी शिकून त्यात तरबेज झाली. पुढे १९२८ मध्ये मेरीची आई आपल्या दोन मुलांना घेऊन मुंबईत आली.

sunitpotnis@rediffmail.com