यास्मिन शेख
अलीकडेच मला आलेला एक गमतीदार पण उद्बोधक, माझ्या ज्ञानात भर घालणारा अनुभव सांगणार आहे.
माझी कन्या डॉ. शमा भागवत हिला भेटायला तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या. मीही तिच्याकडे असल्यामुळे त्यांच्या गप्पात सामील झाले होते. एक जण म्हणाली, ‘‘अहो, आम्ही दोघी करंज्या करण्यासाठी स्वयंपाकघरात बसलो होतो. करंज्यांसाठी पीठ मळताना त्यात किती मोहन घालावं, असं मी हिला विचारलं. हिनं मला किती मोहन घालावं म्हणजे करंज्या खुशखुशीत होतील, हे सांगितलं. इतक्यात बाहेरच्या खोलीत बसलेला माझा नवरा धावत आला आणि म्हणाला, ‘मोहन, मोहन काय बोलताय? काय ग, माझ्यावर टीका करताय की माझ्या चुगल्या करताय?’ आम्ही दोघींनी त्याला समजावलं, ‘अरे पिठात किती मोहन घालायचं याविषयी आम्ही बोलत होतो, तुझ्याबद्दल नाही रे!’’’ तिच्या नवऱ्याचे नाव ‘मोहन’ असल्यामुळे त्याचा हा गैरसमज झाला होता.
हे ऐकत असताना माझ्या लक्षात आले की, ‘मोहन’ (मुलाचे नाव) हा शब्द पुल्लिंगी नाम आहे. पण कणीक किंवा पीठ मऊ होण्यासाठी आपण त्यात तेल, तूप किंवा इतर पदार्थ घालतो, त्याला आपण मराठी भाषक ‘मोहन’च म्हणतो. मात्र हा शब्द नाम, नपुंसकिलगी आहे. (ते मोहन). हा शब्द एखाद्या शब्दाचा अपभ्रंश तर नाही ना? मी चटकन माझ्या खोलीत जाऊन अनेक शब्दकोश उघडून शोध घेतला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या शंकांचे निरसन होऊन माझ्या ज्ञानात भर पडली. ती अशी – मोहन (नाम, नपुंसकिलगी) हा शब्द मोहन नसून ‘मोवन’ आहे. ‘मोहन’ हा शब्द ‘मोवन’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचे स्पष्टीकरण असे –
मोवन (नाम, नपुंसकिलगी) – मूळ शब्द मोव (संस्कृत विशेषण) अर्थ आहे मृदू, मऊ.
त्यापासून सिद्ध झालेले नपुंसकिलगी नाम आहे मोवाणा किंवा मोंवण – अर्थ – लोणी, मार्दव आणणारा पदार्थ. मोवाळणे (क्रियापद) अर्थ – मृदू होणे, वठणीस आणणे. मोंवण या शब्दातील मो अक्षरावरील अनुस्वार आणि ण चा न असा बदल झाला. आणि मधले अक्षर ‘व’ चा ‘ह’ झाला. मोहन (नाम, पु.) अर्थ – मोहून टाकणारा, भुरळ घालणारा. मराठीत ‘मोहन’ (नाम, नपु.) हा अपभ्रंश आपण स्वीकारलेला आहे. मोहन (नाम, नपु.) अर्थ आहे – कणीक वगैरे पदार्थ मृदू होण्यासाठी घातलेले तेल, तूप वगैरे. माझ्या अनेक संस्कृतज्ञ वाचकांना हे माहीत असेलच. पण काही वाचकांना हे नव्याने समजले असेल, असे वाटते. (जसे मला हे वरील अनुभवामुळे कळले.)