सुनीत पोतनीस
भारतीय अभिजात संगीत म्हणजे उत्तर भारतीय ‘हिंदुस्थानी’ संगीत आणि दाक्षिणात्य कर्नाटक संगीत यांनी अनेक पाश्चिमात्य आणि पौर्वात्य परकीय संगीतकारांना अशी काही भुरळ टाकली की, त्यापकी अनेकांनी भारतात येऊन हे संगीत आत्मसात केलं. त्यापकी एक आहेत नेदरलॅण्ड्सच्या सासकिया हास. एक तज्ज्ञ सेलोवादक असलेल्या सासकिया १९९४ साली भारतात आल्या आणि दिल्लीत स्थायिक झाल्या. दिल्ली विद्यापीठातील डॉ. सुमती मोटाटकर तसेच संगीतज्ञ, पंडित डी. के. दातार, पंडित दीपक चौधरी आणि सतारवादक पंडित शुभेंद्र राव यांच्याकडे सासकियांनी ख्याल गायकी आणि वाद्यवादन यांचं शिक्षण चार वर्षेघेतलं.
२००१ साली सासकियांनी सतारवादक पं. शुभेंद्र राव यांच्याशी विवाह करून त्या सासकिया राव झाल्या. दिल्लीत स्थायिक असलेल्या या दाम्पत्याला इवान हा मुलगा आहे. सासकियांनी संगीत क्षेत्रात सेलोवादनावरच पुढे आपलं लक्ष केंद्रित केलं. सेलो हे वाद्य आकाराने मोठं असल्याने उभं राहून वाजवावं लागतं. भारतीय परंपरेप्रमाणे वाद्यवादन जमिनीवर बसून केलं जातं. म्हणून सासकियांनी वाद्यांचे जर्मन तंत्रज्ञ एडवर्ड टॉनजेरेन यांच्याकडून सेलोमध्ये अनेक बदल करून घेतले. सेलो आकाराने लहान करून घेतले तसेच भारतीय सुरावटीला अनुसरून ५ प्रमुख तारा आणि १० साथीच्या तारा त्यात लावून घेतल्या. सासकियांनी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचं सामीलीकरण करून आपल्या सेलोवादनाचे सादरीकरण देश-विदेशांमधल्या संगीत समारोहांमध्ये अनेक वेळा केलंय. त्यामध्ये लखनौचं हरिदास संगीत संमेलन, कोलकात्याची डोव्हरलेन कॉन्फरन्स, जालंधरचे हरवभ संगीत समारोह, वॉशिंग्टनचं केनेडी सेंटर, सिंगापूरचे एस्प्लनेड, २०१४ च्या स्लासगो कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन समारंभ यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘रागमाला’ या नृत्यचमूसाठी सांगीतिक रचना बांधल्या आहेत. पती सतारवादक शुभेंद्रराव यांचे सतारवादन आणि स्वत:चे सेलोवादन यांचा एकत्रित ‘ईस्ट मॅरिज वेस्ट’ या अल्बमने श्रोत्यांची मोठी दाद मिळवली आहे.
sunitpotnis@rediffmail.com