डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
सुमारे ११,००० वर्षांपूर्वी हिमयुगाचा शेवट होत होता. पृथ्वीचे हवामान उबदार होऊ लागले होते. या तापमान बदलामुळे वनस्पतींच्या अनेक प्रजाती उत्क्रांत होऊ लागल्या. जंगली स्वरूपाची धान्ये रुजून येऊ लागली. रुजून येणाऱ्या वनस्पतींची कणसे गोळा करणाऱ्या तत्कालीन मानवाच्या डोक्यात, त्याच सुमारास शेती करण्याची कल्पना आली असावी. मात्र भटकंती करत शिकार करून जगण्याच्या संस्कृतीपासून ते शेती करत एका जागी स्थिर होण्यात, मानवाला त्यानंतरचा चार-पाच हजार वर्षांचा कालावधी लागला. मधल्या काळात शेतीविषयी वेगवेगळ्या प्रकारचे बरेच प्रयोग केले गेले असावेत. पुरुष शिकारीसाठी भटकत होते, स्त्रिया त्यांच्या कच्च्या-बच्च्यांसह मागे राहू लागल्या. त्यांच्या निरीक्षणातून ‘बीज रुजते, रोप येते, त्याला कणसे येतात’ हे सारे लक्षात येऊ लागले होते. यातूनच पुढे शेतीची सुरुवात झाली असावी. शेती करण्याची सुरुवात नीटपणे झाल्यावर माणूस एका जागी स्थिर झाला असावा.
सर्वात प्रथम शेती पश्चिम आशियात सुरू झाली असावी. त्याकाळी या प्रदेशात उपजाऊ जमीन उपलब्ध होती. आजचे इस्राएल, इजिप्त, सीरिया तसेच आसपासचे इतर देश ज्या प्रदेशात येतात, त्या प्रदेशात पद्धतशीरपणे कृषी-प्रयोग सुरू झाले. इ.स.पू. ७००० सालापासून या ठिकाणी गहू, बार्ली, जव, अळशी, सातू अशी धान्ये पेरण्यात येऊ लागली. मसूर, वाटाणे यांच्याबरोबर तेलबिया देणाऱ्या वनस्पतीही लागवडीसाठी वापरण्यात येऊ लागल्या. त्यानंतरच्या काळात जगातील इतर अनेक ठिकाणीही स्वतंत्रपणे शेती विकसित होऊ लागली. चीनमध्ये सोयाबीन, भात, बाजरी, तर मेसोअमेरिकेमध्ये (ग्वाटेमाला, मेक्सिको, निकाराग्वा इत्यादी प्रदेश) बटाटा, टोमॅटो आणि मकासदृश पिकांची लागवड इ.स.पू. ७००० सालच्या सुमारास केली गेल्याचे पुरावे सापडतात. भारतात देखील या कालावधीत मानव शेती करू लागला होता.
शेतीला सुरुवात होण्याच्या अगोदरच्या काळात मानव मांसाहारीच होता. त्याच्या अवशेषांत सापडलेल्या दातांवरून त्याच्या खाण्याच्या सवयींविषयी हा अंदाज बांधता येतो. शेती करणे सुरू झाल्यानंतर त्याच्या दातांच्या रचनेतदेखील फरक होत गेला. इ.स.पू. ६००० ते इ.स.पू. ३५०० वर्षे, या कालावधीत जगभरात, मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू, अँडीज, चीन इत्यादी, ज्या निरनिराळ्या प्राचीन संस्कृती निर्माण झाल्या, त्या मूलत शेतीशी निगडित होत्या. यानंतर मात्र मानव प्रजातीची जीवशास्त्रीय उत्क्रांती झाली नाही. झाली ती केवळ सांस्कृतिक उत्क्रांती!
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org