अलीकडे टीव्हीवर एक जाहिरात येते ती आठवतेय का? एक आघाडीची अभिनेत्री वर्गात येऊन पाहते तो अनेक विद्यार्थी गैरहजर. त्याचं कारण सांगण्यासाठी ती लगेच तो ओळखीचा पांढरा कोट घालत म्हणते डॉक्टरांकडून ऐका. तर खरोखरच एका डॉक्टरांकडून ऐका.

तर परवाच एक पेशंट माझ्याकडे आली. तिच्या अनेक तक्रारी होत्या. तिला कबरेदकांची (काबरेहायड्रेट्सची) अ‍ॅलर्जी होती, वजन भलतंच वाढलेलं होतं, उच्च रक्तदाब तर होताच, सतत थकवा जाणवत असे आणि मुख्य म्हणजे तिचे डोळे सतत कोरडेच राहत. आपल्या डोळ्यांमध्ये सतत अश्रूंचा पाझर होत असतो. डोळ्यांना जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी निसर्गानं केलेली ती तजवीज आहे. त्यामुळं डोळे नेहमीच ओलसर राहतात. पण त्या स्त्रीचे डोळे कोरडेच झाले होते. कित्येक उपाय झाले पण कशामुळंच फरक पडला नाही. तिला तपासल्यावर माझं असं मत झालं की, तिच्या या अनारोग्याच्या मुळाचाच विचार आजवर झाला नव्हता. मी फार काही नाही केलं. तिची जी काही औषधं आणि पथ्य होतं त्यात एकाच घटकाचा समावेश केला. महिनाभरातच फरक दिसायला लागला. वजन चांगलंच घटलं. रक्तदाब आटोक्यात आला, उत्साह वाढला आणि मुख्य म्हणजे डोळ्यांमधला दुष्काळ संपला, तिथं परत पाणी आलं.

तिच्या सगळ्या तक्रारींचं कारण होतं तिच्या आहारात असलेली आयोडिनची कमतरता. आयोडिन हा सूक्ष्म प्रमाणातला पण कळीचा पोषक पदार्थ आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशीला त्याची गरज असते. खास करून थायरॉईड ग्रंथीला. ही ग्रंथी रक्तामधून आयोडिन शोषून घेते आणि टायरॉसिन या अमिनो आम्लाबरोबर प्रक्रिया करून ट्रायआयोडोथायरॉनिन व थायरॉक्सिन हे दोन महत्त्वाचे संप्रेरक तयार करते. ट्रायआयोडोथायरॉनिनमध्ये आयोडिनचे तीन रेणू असतात तर थायरॉक्सिनमध्ये चार. त्यामुळं त्यांना टी३ आणि टी४ या नावांनीच ओळखलं जातं.

टी३ व टी४ ही संप्रेरकं शरीराचं चयापचय योग्य स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपला बेसल मेटॅबोलिक रेट म्हणजेच आपल्या शरीराला नुसतं जगत राहण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचं संतुलन राखणारा घटक. या दोन्हीपैकी एकाही संप्रेरकाच्या प्रमाणात बिघाड झाल्यास हे संतुलनही बिघडतं आणि त्या रुग्ण स्त्रीसारख्या अनेक लक्षणांमध्ये ते प्रतििबबित होतं.

शरीरस्वास्थ्य राखायचं असेल तर शरीराला नियमित आणि योग्य प्रमाणात आयोडिन मिळणं अत्यावश्यक आहे.

डॉ. बाळ फोंडके 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org