जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टनि क्लॅपरॉथ यांनी सन १७८९ मध्ये पिचब्लेंड हे युरेनिअमचे खनिज नायट्रिक आम्लात विरघळवून त्यापासून पिवळ्या रंगाचा एक पदार्थ मिळवला. एका नव्या मूलद्रव्याचे हे ऑक्साइड आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यापासून मूलद्रव्य वेगळे काढण्यासाठी त्याने तो पदार्थ कोळशाबरोबर गरम केला. या प्रयत्नांत त्याला चकचकीत काळ्या रंगाची पूड मिळाली. ती पूड म्हणजे नवीन मूलद्रव्यच आहे असा क्लॅपरॉथ यांचा समज झाला. या घटनेच्या काही काळ आधी सूर्यमालेतील सातव्या ग्रहाचा शोध लागला होता. इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ सर विल्यम हर्षल यांनी ग्रीकांची आकाशदेवता युरेनसच्या सन्मानार्थ या ग्रहाचे नाव ‘युरेनस’ असे ठेवले होते. या शोधामुळे प्रभावित झालेल्या मार्टनि क्लॅपरॉथ यांनी नवीन मूलद्रव्याला युरेनिअम असे नाव दिले. पुढे १८४१मध्ये युजीन पेलिगॉट यांनी युरेनिअम टेट्राक्लोराईडचे पोटॅशिअमद्वारे क्षपण करून धातूरूपात शुद्ध युरेनिअम वेगळा केला.
सुरुवातीच्या काळात या वजनदार आणि तुलनात्मक मऊ असलेल्या युरेनिअमने औद्योगिक क्षेत्र तसेच वैज्ञानिकांनाही आकर्षति केले नाही. पण प्राचीन काळापासून युरेनिअमच्या संयुगांचा काचांना हिरवा रंग देण्यासाठी वापर करीत असत. याचा सर्वात जुना आणि खात्रीलायक पुरावा इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकातला, इटलीत सापडला आहे.
मेंडेलीव्हच्या भाकितानुसार इतर सर्व मूलद्रव्यांमध्ये युरेनिअम आपल्या अत्याधिक अणुभारामुळे लक्षवेधक ठरतो. त्याचा सर्वात मोठा वस्तुमान संचय हाच त्याच्या अद्वितीय वैशिष्टय़ांचा पाया आहे. संशोधकांनी युरेनिअमच्या संयुगांवर खास लक्ष पुरवावे असे मेंडेलीव्ह यांचे मत होते. पुढील २५ वर्षांत युरेनिअमच्या किरणोत्सारितेच्या प्रयोगातून ही भविष्यवाणी प्रत्यक्षात आली.
युरेनिअम हे दुर्मीळ मूलद्रव्यांमध्ये गणले जात असले तरी पृथ्वीवरील त्याचे प्रमाण हे चांदीपेक्षा जास्त आहे.
युरेनिअम-२३५ केवळ एक टक्का तर युरेनिअम-२३८ चे प्रमाण ९९ टक्के सापडते. युरेनिअम-२३८ या समस्थानिकाचा अर्धआयुष्यकाल ४.५ अब्ज वर्षे, म्हणजेच पृथ्वीच्या वयाइतका आहे. याचा वापर पृथ्वीवरील दगडांचे वय ठरविण्यासाठी केला जातो. निसर्गात किरणोत्साराद्वारे युरेनिअमची संयुगे ०.१ वॅट प्रतिटन इतकी ऊर्जा उत्सर्जति करतात. शास्त्रज्ञांच्या मते या ऊर्जेमुळेच पृथ्वीचा गाभा तप्त रूपात राहतो आणि कवचाखाली गरम द्रवरूप मॅग्मा राहून त्यावरील खंडांचे संक्रमण शक्य होते.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org