श्रुती पानसे

माणसासमोरच्या समस्या कधी संपत नाहीत. या समस्या सतत चालूच राहणार आहेत. या समस्या त्यातल्या त्यात बऱ्या पद्धतीने सोडवता येणं हे खरंतर बुद्धिकौशल्याचं काम आहे.

हे बुद्धिकौशल्य लहान मूलही वेळोवेळी दाखवतं. घरात दोनच माणसं असताना ‘मी नाई रंग सांडवला,’ असं बिनदिक्कत सांगतं. याचा अर्थ पुढे हे लोक मला रागवणार, दटावणार (आणि माझ्या समस्या वाढणार) त्यापेक्षा आधीच सारवासारव केलेली बरी. हे बुद्धिकौशल्य ते लहानसं मूलही दाखवतं.

अशा पद्धतीने लहानपणापासून मुलं खरं तर स्वत:च समस्या सोडवत असतात. पण कधी कधी त्यांचा ‘अनुभव’ कमी पडतो. समजा मूल एखाद्या गोंधळाच्या प्रसंगात सापडलेलं आहे. काय करावं हे सुचत नाही आणि त्याच वेळेला त्याला आई-बाबांची आठवण येते. आता हा सगळा गोंधळ निस्तरला जाईल याच विश्वासाने रडणारं मूल तक्रारी घेऊन आई-बाबांकडे धाव घेतं. एवढय़ानंही त्याचं मन आश्वस्त होतं. ते शांत होतं

हे सर्व घडतं कारण विश्वासाची भावना. जेव्हा समस्या निर्माण होते, कसला तरी गोंधळ होतो, तेव्हा ताणामुळे कॉर्टसिॉल निर्माण होतं. जरासं शांत झाल्यावर आपल्याला या समस्येतून कोण सोडवेल, याचा विचार केल्यावर योग्य व्यक्तीचं नाव सुचतं. ते सुचल्यावर लगेच आपल्या मेंदूतल्या पिटय़ूटरी ग्रंथींमध्ये ऑक्सिटोसिन या नावाचं रसायन निर्माण होतं. कारण विश्वासाची भावना निर्माण झालेली असते. ज्या वेळी आपल्याला प्रेमाची व्यक्ती समोर दिसते किंवा तिची फक्त आठवण येते किंवा नामस्मरण, एखादा मंत्र, हातामध्ये एखादं चित्र, एखादं प्रतीक, विशिष्ट पुस्तक, ज्यावर आपली मनापासून श्रद्धा आहे, विश्वास आहे, ज्याचं आपण स्मरण करतो, त्या वेळेला ऑक्सिटोसिन हे रसायन मेंदूत तयार झालेलं असतं. आणि आता सर्व काही नीट होणार अशी भावना मनामध्ये निर्माण होते.

असाही अनुभव आलेला असेल की, प्रत्यक्ष कोणीही मार्ग दाखवायला आलेलं नसतं. गोंधळ आणि ताण या गोष्टी या रसायनामुळे दूर सारल्या जातात. मळभ दूर होतं. त्यानंतर आपण लॉजिक आणि अनुभव वापरतो. समोरची वाट दिसायला लागते.

contact@shrutipanse.com

Story img Loader