– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साक्षीभाव मानसोपचारात वापरणारी आणखी एक पद्धती म्हणजे ‘अ‍ॅक्ट थेरपी’ होय. ‘अ‍ॅक्सेप्टन्स अ‍ॅण्ड कमिटमेंट’ म्हणजे ‘स्वीकार’ आणि ‘निर्धार’ हे शब्द नावातच असलेल्या या पद्धतीत सहा तंत्रे आहेत. ‘साक्षीभाव’ हे त्यातील एक आहे. ‘वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे’ आणि ‘भविष्याचा विचार करून मूल्यनिश्चिती करणे’ या दोन तंत्रांचा उपयोग करून मानसोपचार सुरू केले जातात. वर्तमानक्षणी मनात कोणत्या भावना आणि विचार आहेत, त्यांचा परिणाम शरीरावर जाणवतो आहे का, हे लक्ष देऊन पाहायचे. जे जाणवत असेल त्याला प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करायचा. ‘परिस्थितीचा आणि मन:स्थितीचा स्वीकार’ हे या उपचारातील महत्त्वाचे तत्त्व आहे. हा स्वीकार शक्य होण्यासाठी शरीर व मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

मनातील विचारांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे शक्य होण्यासाठी त्या विचारांपासून अलग होणे आवश्यक असते. अन्यथा माणूस विचारांच्या प्रवाहात वाहत असतो. विचारापासून अलग होणे- ‘डिफ्युजन’ हे पाचवे तत्त्व आहे. वर्तमानावर लक्ष, विचारांपासून अलग होणे, साक्षीभाव विकसित करणे आणि शरीर-मनात जे काही जाणवते आहे त्याचा स्वीकार ही चार तंत्रे ध्यानाच्या सरावाने विकसित होतात. साक्षी ध्यानाच्या सरावात याच चार गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र या मानसोपचार पद्धतीत रोज अशा ध्यानासाठी ठरावीक वेळ द्यायलाच हवा असा आग्रह नाही. वेळोवेळी लक्ष वर्तमान क्षणात आणून इतर तीन तंत्रे उपयोगात आणावी असे सांगितले जाते. दिवसभरात असे किती वेळा करू शकलो, याची नोंद ठेवायची असते. त्या व्यक्तीने जी मूल्ये निवडली आहेत त्या दिशेने प्रगती करण्यासाठी असा सराव करणे महत्त्वाचे आहे, याची चर्चा समुपदेशनात केली जाते.

आरोग्य, मानसिक शांती ही मूल्ये या सरावाने साध्य होतातच; पण नातेसंबंध, बळकट शरीर, समृद्धी अशी मूल्ये महत्त्वाची असतील तर या सरावाच्या जोडीला अन्य कोणत्या कृती करायला हव्यात याचीही यादी केली जाते. हा ‘कृती-कार्यक्रम लिहून काढणे आणि तो अमलात आणण्याचा निर्धार करणे’ हे सहावे तंत्र आहे. समुपदेशनाच्या पहिल्या सत्रात मूल्ये आणि कृती-कार्यक्रम निश्चित करून साक्षी ध्यानविषयक एकेक तंत्र नंतरच्या सत्रांमध्ये शिकवले जाते. त्यासाठी खेळ आदींचा उपयोग करून घेतला जातो. औदासीन्य, ओसीडी, तीव्र भीती, आघातोत्तर तणाव असे अनेक त्रास या उपचाराने कमी होतात.

yashwel@gmail.com