डॉ. यश वेलणकर
आधुनिक संशोधन सांगते की, मेंदूतील रसायने आणि भावना यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. डोपामाइन वाढले की उत्सुकतेचा आनंद वाटू लागतो हे जसे खरे आहे, तसेच आपण प्रयत्नपूर्वक उत्सुकता वाढवली की मेंदूतील डोपामाइन वाढते, हेही. कंटाळा घालवण्यासाठी मनात उत्सुकता निर्माण करणे हा उपाय आहे. माणसाला कंटाळा येतो हे बरेच झाले! हा कंटाळा घालवण्यासाठीच माणसाने साहसे केली, त्यामुळेच नवीन प्रदेशांचा शोध लागला, कला-क्रीडा विकसित झाल्या. म्हणजे कंटाळा वाईट नाही; कारण तो सर्जनशीलतेला, जगण्याला प्रेरणा देणारा आहे. त्या दृष्टीने एखादी गोष्ट सवयीची/ नेहमीची झाली, की ती करताना डोपामाइन पाझरत नाही, हे चांगलेच आहे. त्यामुळे माणूस नावीन्याचा शोध घेतो.
मात्र हाच कंटाळा काही वेळा व्यसनांना जन्म देतो. माणसाला कोणतेही व्यसन लागते, त्यास डोपामाइन कारणीभूत असते. दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थाचे असते किंवा शॉपिंग, कम्पल्सिव्ह सेक्स, पॉर्न, जुगार, समाजमाध्यमे यांचेही व्यसन असते. सुरुवातीला या गोष्टी उत्तेजित करणाऱ्या असतात. त्या उत्तेजनामुळे डोपामाइन पाझरते. त्यामुळे छान वाटते. मात्र मेंदूत डोपामाइन सतत एकाच पातळीत राहात नाही, काही वेळाने ते कमी होते. ते कमी झाले की अस्वस्थ, कंटाळवाणे वाटू लागते. तो कंटाळा दूर करण्यासाठी पुन्हा ती कृती केली जाते. हळूहळू ती कृती केल्याशिवाय चन पडत नाही, यालाच आपण व्यसन म्हणतो. नावीन्य संपले की डोपामाइनचे प्रमाण कमी होणे, हे इथेही होते. यामुळेच पेगचे, झुरक्यांचे प्रमाण वाढत जाते. पॉर्न व्हिडीओ अधिकाधिक बीभत्स लागतात. सेक्समध्ये विकृती येते. शॉपिंगचे प्रमाण वाढते.
मेंदूतील ‘न्यूक्लिअस अक्युम्बंस’ नावाचा भाग डोपामाइनमुळे उत्तेजित होतो, त्या वेळी माणसाला छान वाटते. डोपामाइन कमी झाले की हा भाग शांत होतो आणि छान वाटण्यासाठी पुन्हा ती कृती करण्याची तीव्र इच्छा होते. ती पूर्ण केली नाही की अस्वस्थता येते. येथेच सत्त्वावजय चिकित्सा उपयोगी पडू शकते. मनात अस्वस्थता आली की शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते ते उत्सुकतेने पाहू लागलो, की स्वीकार शक्य होतो आणि व्यसनाची गुलामी झिडकारता येते. मात्र त्यासाठी साक्षीध्यानाचा नियमित सराव आवश्यक आहे.
yashwel@gmail.com