– डॉ. यश वेलणकर
माणसाच्या भावना तीन स्तरांच्या असतात. जैविक भावना म्हणजे भीती, राग, उदासी, वासना या ‘मी’शी निगडित. मेंदूच्या हार्डवेअरचा त्या भाग असल्याने शरीरमन याविषयी ‘मी’चा भाव आहे तोवर त्या असतातच. त्यांची तीव्रता कमी करणे हेच साऱ्या मानसोपचार पद्धतींचे ध्येय. शरीरमनाविषयी काही वेळ साक्षीभाव धारण केला की मेंदूत रचनात्मक बदल होऊन या भावनांचे बळ कमी होते. दुसऱ्या पातळीवरील वैचारिक भावना या आपल्या गटाच्या लाभासाठी महत्त्वाच्या असतात. तिसऱ्या पातळीच्या भावना मात्र गटातटाच्या सीमा ओलांडून जातात. माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. या पेशींतील डीएनएमध्येच स्व कोरलेला असतो. असे असले तरी शरीरात जेवढय़ा त्या माणसाच्या पेशी असतात त्यापेक्षा अनेक पट अधिक पेशी परकीय असतात. या सजीव पेशी म्हणजे उपयुक्त जंतू शरीराच्या आरोग्यासाठी आणि निरोगी भावनांसाठी महत्त्वाचे असतात. म्हणजे सामान्यत: माणूस ज्याला ‘मी’ असे समजत असतो, ते शरीरही केवळ ‘मी’च्या पेशींचे नसते. ‘मी’च्या पेशी फक्त एकदशांश असतात. ‘मी’चे स्वास्थ्य, सुखदु:ख, कर्तृत्व, यशापयश हे विश्वातील असंख्य घटकांवर अवलंबून असते याचे भान ठेवून, अशा सर्व दृश्य-अदृश्य प्राण्यांचे कल्याण होवो अशी भावना माणसाच्या मेंदूतील सर्वात नंतर विकसित झालेल्या ‘प्रीफ्रन्टल कोर्टेक्स’मुळे शक्य आहे. अशा भावना मनात धारण करणे म्हणजे करुणाध्यानाचा समावेश शिक्षणात होणे गरजेचे आहे. त्यामुळे अनावश्यक चिंता, औदासीन्य टाळता येते, अहंकार आणि दुसऱ्याला त्रास देण्याची प्रवृत्ती कमी होते असे मेंदू संशोधनात दिसत आहे. मनात समानुभूती असते त्या वेळी मेंदूत इन्सुला हा भाग सक्रिय असतो. ज्यांनी करुणाध्यान केलेले आहे असे योगी आणि असे ध्यान न केलेली त्याच वयाची माणसे यांच्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले. या दोन्ही गटातील व्यक्तींना ते ध्यान करीत नसताना दु:खद किंकाळ्या ऐकवल्या आणि त्यांच्या मेंदूमध्ये काय होते याचे परीक्षण केले. करुणाध्यान करणाऱ्यांच्या मेंदूतील इन्सुला दुसऱ्या गटाच्या तुलनेत अधिक सक्रिय झाला, अनोळखी माणसांच्या दु:खाची जाणीव त्यांच्या मेंदूला अधिक झाली. त्यामुळे युद्धे व हिंसाचार टाळण्यासाठी जैविक भावनांची तीव्रता कमी करणारे साक्षीध्यान आणि उन्नत भावनांचा विकास करण्यासाठी करुणाध्यान सर्वाना शिकवणे आवश्यक आहे.
yashwel@gmail.com