– डॉ. यश वेलणकर
मेंदूतील अल्फा आणि बीटा लहरी या माणसाच्या जागृतावस्थेत असतात. आपण तर्क, विचार करीत असतो तेव्हा बीटा लहरींचे प्रमाण वाढते. याउलट माणूस निवांत आणि शांत असतो तेव्हा अल्फा लहरी अधिक असतात. चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेये माणसाला उत्तेजित करतात, कारण त्यांच्यामुळे बीटा लहरींचे प्रमाण वाढते. पण या लहरी सतत अधिक प्रमाणात असतील, तर ते तणावाचे लक्षण असते. मेंदूत सतत बीटा लहरी असणे चांगले लक्षण नाही, या अवस्थेला ‘अल्फा ब्लॉकिंग’ असे म्हणतात. म्हणजे सतत मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या बीटा लहरी अल्फा लहरींना निर्माण होऊ देत नाहीत, त्यांना ‘ब्लॉक’ करतात. ध्यानामुळे हे ‘अल्फा ब्लॉकिंग’ कमी होते, असे संशोधनात आढळले आहे.
मंत्रचळ, चिंतारोग असणाऱ्या माणसाच्या मेंदूत सतत बीटा लहरीच राहतात. अल्फा लहरी निर्माण होत नाहीत. ध्यानाच्या सरावाने बीटा लहरींचे प्रमाण कमी होऊन ‘अल्फा ब्लॉकिंग’ कमी होते, त्यामुळे ध्यान चिकित्सा अशा त्रासात उपयोगी ठरते. दारू प्यायल्यानंतरही बीटा लहरी कमी होऊन अल्फा लहरींचे प्रमाण वाढलेले आढळते; कारण त्या वेळी मेंदूतील विचार करणारी केंद्रे बधिर झालेली असतात. त्याचमुळे चिंता, उदासी यांनी त्रासलेल्या माणसाला दारू घेतल्यानंतर बरे वाटते. म्हणजे ध्यान आणि दारू यांचे मेंदूतील परिणाम सारखेच आहेत. पण दारूचे शरीरावर दुष्परिणाम होतात, तसे ध्यानाचे होत नाहीत. उलट ध्यानाचे शरीरावर चांगले परिणाम होतात. माणूस दिवसभर सतत दारू पीत राहू शकत नाही; तसा राहू लागला तर त्याचे आरोग्य आणि कार्यक्षमता धोक्यात येते.
उलट, ध्यान प्रत्येक तासात चार-पाच मिनिटे करता येते. माणूस डोळे मिटून शांत बसला, श्वासामुळे होणारी हालचाल किंवा शरीरातील संवेदना साक्षीभावाने जाणू लागला, की मेंदूतील अल्फा लहरी वाढतात. माणूस मनाची शांतता अनुभवू लागतो. पण या लहरींचे प्रमाण सतत जास्त असेल, तर मात्र तो माणूस बौद्धिक कामे करू शकत नाही. तो प्रगतीसाठी आवश्यक असलेला चांगला तणावही घेत नाही. त्याचसाठी कर्ता आणि साक्षीभाव यांचा समतोल साधायला हवा. कर्ता भाव ठेवून विचार करायला हवा, मेंदूतील बीटा लहरी वाढवायला हव्यात. पण ‘अल्फा ब्लॉकिंग’ टाळण्यासाठी अधूनमधून लक्ष वर्तमान क्षणात आणायला हवे, साक्षीभाव अनुभवायला हवा.
yashwel@gmail.com