डॉ. यश वेलणकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इच्छापूर्ती झाली नाही की नाराजीतून क्रोध येतो, हे मानसिक सत्य भारतीय तत्त्वज्ञानात सांगितले आहे. ‘संङ्गात संजायते काम: कामात्क्रोधो अभिजायते।’ हा ‘भगवद्गीते’तील श्लोक प्रसिद्ध आहे. मनातील इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध येतो. ‘क्रोधात् भवति संमोह:’.. हा क्रोध तीव्र झाला की संमोह निर्माण करतो. म्हणजेच माणूस बेभान होतो.. ‘संमोहात स्मृतिविभ्रम:’ बेभान झाल्याने सजगता राहत नाही. स्मृतिभ्रंश होतो. ‘स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो’.. सजगता हरवली की योग्य काय अयोग्य काय, याचे भान राहत नाही. योग्य काय हे सांगणाऱ्या विवेकबुद्धीचा नाश होतो. ‘बुद्धेर्नाशात् प्रणश्यति’.. बुद्धिनाश झाला की सर्वनाश करणारी कृती घडते.
आजचे मेंदूविज्ञान सांगते की, तीव्र भावनांमुळे मेंदूत ‘इमोशनल हायजॅक’ होतो. भावनिक मेंदू वैचारिक मेंदूला काम करण्याची संधी न देता चुकीची कृती घडवून आणतो. अशी विनाश करणारी कृती घडू द्यायची नसेल, म्हणजेच भावनिक बुद्धी विकसित करायची असेल तर स्मृतिभ्रंश म्हणजेच ‘माइंडलेसनेस’ टाळायला हवा. माइंडलेसनेस म्हणजे मनात या क्षणी कोणते विचार, कोणत्या भावना आहेत, याचे भान नसणे. असे भान नसते त्या वेळी भावना माणसाचा ताबा घेतात आणि बुद्धीला म्हणजेच वैचारिक मेंदूला संधी न देता कृती घडवून आणतात. हे टाळण्यासाठी सजगता विकसित करायला हवी. ती केवळ श्लोक पाठ करून होणार नाही. पु. ल. देशपांडे यांनी ‘तुझें आहे तुजपाशीं’ या नाटकात श्लोक पाठ करणाऱ्या श्यामची खिल्ली उडवली आहे. केवळ श्लोक पाठ करून क्रोध कमी होत नाही, हेच त्यांनी आचार्य या पात्रातून दाखवले आहे. त्रासदायक भावनांची, तणावाची तीव्रता कमी करायची असेल, तर मनातील विचार आणि भावना त्यापासून अलग होऊन जाणले पाहिजेत. त्यासाठी आपले ध्यान- म्हणजेच ‘अटेन्शन’ विकसित केले पाहिजे. सध्या माहितीच्या युगात ही लक्ष देण्याची क्षमता दुर्लक्षिली जात आहे. माणसाचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. विचलित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मानसिक तणाव व तणावजन्य आजार वाढण्याचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. आपल्यावर त्रासदायक तणाव आहे याचेच माणसांना भान नसते. हे लक्षात आल्यानेच मानसोपचारात वर्तन, विचार व भावना यांच्याबरोबर आता ध्यान म्हणजेच अटेन्शनलाही महत्त्व दिले जाते.
yashwel@gmail.com