डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानसरोगात आरोग्य आणि आजार यांची सीमारेषा खूप अंधूक असते. प्रत्येक माणसाला कसली तरी भीती असू शकते, चिंता वाटते; पण या भावनांचा दुष्परिणाम त्या माणसाच्या वर्तनावर होऊ लागतो. त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते. अशा वेळी त्यावर उपाययोजना करायला हवी. माणसाला चिंता असायलाच हवी .माणसाला कार्यप्रवृत्त करणारी चिंता निरोगी चिंता असते; पण जेव्हा करण्यासारखे काहीच नसते, तरीही चिंता मन कुरतडत राहते तेव्हा या त्रासाला जनरलाइज्ड अँक्झायटी डिसऑर्डर म्हणतात. स्वत:ची किंवा प्रिय व्यक्तीची प्रकृती, संपत्ती, भविष्य याविषयी नकोनकोसे विचार येत राहतात. सतत चिंता वाढवणाऱ्या बातम्या ऐकत राहिल्याने हा त्रास वाढतो. हे समजत असूनही दुसरीकडे लक्ष लागत नाही. बुद्धीला असे त्याच त्या  विचारात राहणे चुकीचे आहे हे पटत असते; पण तरीही मन शांत होत नाही. अस्वस्थतेमुळे झोप लागत नाही; लागली तरी मधेच जाग येते. डोकेदुखी, घाम येणे, बोटांना कंप, डोक्यात गरम वाफा, घुसमटल्यासारखे वाटणे, छातीत धडधड अशी लक्षणेही असू शकतात. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत राहतो. स्नायुदुखी आणि सतत थकवा वाटतो. विद्यार्थ्यांना असा त्रास असेल तर त्याचा दुष्परिणाम अभ्यासावर होऊ लागतो. समुपदेशन आणि अटेन्शन ट्रेनिंग यांनी हा त्रास बरा होऊ शकतो. काही वेळा त्याला मेंदूतील रसायने बदलणाऱ्या औषधांची जोड द्यावी लागते.

आपले लक्ष पुन:पुन्हा वर्तमान क्षणात आणायचे, ही ध्यानाच्या सरावाची पहिली पायरी आहे. दिवसभरात आपले लक्ष वर्तमान क्षणात आहे का, हे पुन:पुन्हा पाहायचे आणि आपले लक्ष त्या क्षणी येणारे आवाज, जाणवणारे स्पर्श, शरीरातील संवेदना यांवर आणायचे. असा त्रास असलेल्या व्यक्तीला- विचार अधिक करतोस, तसे करू नकोस, असा सल्ला अनेकांनी दिलेला असतो. मात्र ती व्यक्ती विचार करीत नसते, मनात तेच-तेच विचार आपोआप येत असतात. ते कमी करण्यासाठी लक्ष पुन:पुन्हा शरीरावर आणायचे आणि जे काही जाणवते त्याचा साक्षिभाव ठेवून स्वीकार करायचा. असे केल्याने हा त्रास कमी होतो. लक्ष वर्तमान क्षणात आणतो, त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते. जे काही घडते आहे, त्याचा स्वीकार करण्याच्या सरावाने- म्हणजेच साक्षिध्यानाने- त्रासदायक चिंता कमी होते.

yashwel@gmail.com