– डॉ. यश वेलणकर
औदासीन्य हा आजार वेगाने वाढत असताना- ‘‘मी’ हे एक गाठोडे आहे, त्यातील वेगवेगळा ‘मी’ संदर्भानुसार महत्त्वाचा ठरतो’ हे भान हा आजार टाळण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी आहे. ‘‘मी’ची सजगता’ ही औदासीन्य प्रतिबंधक लस आहे! सध्या ती खूप आवश्यक आहे. ‘डिप्रेशन’ असताना हे भान हरवलेले असते. एखादा तरुण प्रेमभंग झाल्याने उदास होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतो. त्या वेळी त्या मुलीचा प्रेमिक हा एकच ‘मी’ त्याचे भावविश्व व्यापून टाकत असतो. ‘प्रेमिक मी’ अपयशी झाला म्हणून इतके तीव्र दु:ख होते की, आयुष्यात काहीच अर्थ नाही असे वाटू लागते. अशा वेळी ‘मी’ हा केवळ ‘प्रेमिक मी’ नसून ते एक गाठोडे आहे याची सजगता असेल तर नैराश्याची तीव्रता कमी होते. तो तरुण त्या मानसिक धक्क्यातून सावरतो; शिक्षण, करिअर यांस महत्त्व देऊ लागतो.
‘मी पडलो’ या वाक्यात ‘मी’ हा शब्द शरीराला उद्देशून आहे. ‘मला वाईट वाटले’ या वाक्यात ‘मी’ मन आहे. शरीरमनाबरोबरच या शरीरमनाशी निगडित अनेक गोष्टी ‘मी’मध्ये समाविष्ट होत असतात. चेन्नईमध्ये असताना मराठी बोलणारा माणूस पाहिला की माझ्यातील ‘मी मराठी’ जागा होतो. अमेरिकेत असताना कन्नड माणूस भेटला की माझ्यातील ‘मी भारतीय’ प्रकट होतो. म्हणजेच माझ्यातील ‘मी’ हा संदर्भानुसार बदलत असतो, संदर्भानुसार व्यक्त होत असतो.
‘मी’ ही एकच गोष्ट नसून ती अनेक गोष्टींचे एक गाठोडे असते. ‘मी’ कुणाचा तरी बाप असतो, नवरा असतो, मित्र असतो, मुलगा असतो. प्रत्येक नात्याचा एक ‘मी’ असतो. ‘माझे काम’, ‘माझा व्यवसाय’ हादेखील एक ‘मी’ असतो. बऱ्याचदा माणसाचे अपयश एका वेळी एकाहून अधिक ‘मी’शी संबंधित असते. परीक्षेत, व्यवसायात वा एखाद्या नातेसंबंधात अपयश आलेले असते; मात्र तो माणूस ते अपयश, ते दु:ख सर्वव्यापी करून टाकतो. त्यामुळे मानसिक वेदना तीव्र होतात. ‘मी’च्या गाठोडय़ात काय काय आहे याचे भान वाढवणे, हा सत्त्वावजय चिकित्सेचा महत्त्वाचा भाग आहे. संदर्भानुसार ‘स्व’चे भान- ‘व्यावसायिक मी’ किंवा ‘आई मी’ अशा एकच ‘मी’ने आपले सारे आयुष्य व्यापले आहे का, याविषयी माणसाला जागृत करते.
yashwel@gmail.com