– डॉ. यश वेलणकर
पंच ज्ञानेंद्रियांनी झालेल्या जाणिवेचे आकलन होत असताना स्मरणशक्तीची जोड घेतली जाते. ती प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यानुसार समोर दिसणाऱ्या दृश्याचा अर्थ लावला जातो. एखादे चित्र पाहिले, की मनात लगेच विचार येतात. चित्र नग्न व्यक्तीचे असेल, तर त्या विचारांचा परिणाम म्हणून भावनाही जागृत होतात. पण या भावना आकलनाचा परिणाम असतो. अश्लीलता दृश्यात नसते, पाहणाऱ्याच्या मेंदूत असते, असे याच अर्थाने म्हणतात. डॉक्टरला ते नग्न चित्र पाहिल्याने वेगळे, एखाद्या रोगाचे आकलन होऊ शकते; चित्रकाराला वेगळे आकलन होऊ शकते. मेंदूला माहीत असते तेच डोळ्यांना दिसते, हेदेखील जाणीव आणि आकलन यांतील फरक स्पष्ट करणारेच आहे. हा फरक न केल्याने गैरसमज होतात. ‘समाजमाध्यमांवर एक लेख लिहिला, पण त्याला कुणीच पसंतीचा अंगठा दाखवला नाही,’ ही जाणीव हे सत्य आहे. पण ‘मला कुणीच महत्त्व देत नाही, कुणीच माझ्यावर प्रेम करीत नाही,’ हे विचार किंवा ‘लोकांना फालतू वाचायला आवडत असते, सर्व माणसे मूर्ख आहेत,’ असे विचार हेही त्या व्यक्तीचे आकलन असते. ते यथार्थ असतेच असे नाही.
वास्तवाला मनातली संकल्पना जोडून कथा तयार होतात. या कथा मनाने तयार केलेल्या असल्या, तरी तेच सत्य आहे असे वाटते. त्यामुळे अनेक नाती तुटतात, ‘मला नाकारले गेले आहे’ असे वाटू लागते. ‘ती त्याचा फोन घेत नाही, कट करते’ हे वास्तव असले, तरी त्याचा अर्थ ‘ती त्याला टाळते आहे’ असा‘च’ नसतो. त्यामागे अनेक वेगळी कारणे असू शकतात. जाणीव आणि आकलन यांतील फरक जाणण्याच्या सरावाने हा घोटाळा कमी करता येतो. पाहताना केवळ पाहा, ऐकताना ऐका; त्यातून विचारांना निर्माण करू नका, असा उपदेश गौतम बुद्धांपासून जे. कृष्णमूर्तीपर्यंत अनेकांनी केला आहे. तेच आता- ‘जाणीव आणि आकलन यांमध्ये फरक करा’ अशा शब्दांत मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत. सामान्य माणसाला केवळ पाहणे- पण विचार निर्माण न करणे शक्य होत नाही. त्यामुळे फारशी ध्यानसाधना न केलेला संसारी माणूस पाहताना ‘केवळ पाहू’ शकत नाही. पण पाहिल्यानंतर निर्माण झालेला विचार ही एक शक्यता आहे- ते खरे असेलच असे नाही, याचे भान आपण सारे ठेवू शकतो. हे भान राहिले नाही तर राग, उदासीनता वाढते.
– डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com