– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लक्ष जाणे’ आणि ‘लक्ष देणे’ या दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत, हे मेंदूमध्येही दिसते. लक्ष जाते त्या वेळी मेंदूत काय घडते, हे तपासण्यासाठी माणसाला संगणकाच्या पडद्यासमोर ठेवून त्याच्या मेंदूचे परीक्षण केले जाते. त्या पडद्यावर वेगवेगळे आकार असतात. माणूस ते पाहत असताना संगणकाच्या पडद्यावर एक अक्षर चमकू लागते. त्याबरोबर लक्ष त्याकडे जाते. त्या वेळी मेंदूतील ‘परायटल कॉर्टेक्स’मधील एक भाग सक्रिय होतो. तेव्हा मेंदूत दृष्टिकेंद्राकडून जैविक मेंदूतून वैचारिक मेंदूकडे जाणारे तरंग वाढलेले दिसून येतात. याला ‘बॉटम-अप’ म्हणजे ‘तळाकडून वर सक्रियता’ म्हणतात.

त्यानंतर त्या माणसाला त्या चकाकणाऱ्या अक्षराकडे लक्ष न देता पडद्यावरील एक अक्षर- उदाहरणार्थ ‘ओ’ शोधून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाते. तो असे लक्ष देतो तेव्हा त्याच्या मेंदूत वरून खाली (टॉप-डाऊन) तरंग वाहू लागतात. तेव्हा मेंदूत ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’मधील एक भाग सक्रिय होतो.

याचा अर्थ, माणसाचे ‘लक्ष जाते’ त्या वेळी खालून वर आणि तो ‘लक्ष देतो’ त्या वेळी वरून खाली लहरी मेंदूत वाहत असतात. मोठ्ठा आवाज, चमकणारी वा हलणारी वस्तू यांकडे आपोआप लक्ष जाते, तसेच शरीरात कुठे चमक आली तरी तिकडे लक्ष जाते आणि मेंदूत तळाकडून वर लहरी जात राहतात. याउलट लक्ष देतो त्या वेळी वैचारिक मेंदू निर्णय घेतो आणि त्यानुसार ठरावीक दृश्य, आवाज किंवा शरीर यांकडे लक्ष दिले जाते. तेव्हा वरून तळाकडे लहरी जातात. वयाच्या सहा-सात वर्षांपर्यंत ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ सक्रिय नसल्याने लक्ष देण्याची प्रक्रिया कमी असते. या मुलांचे लक्ष वेधून घ्यावे लागते. त्यानंतर मात्र कुठे लक्ष द्यायचे याचा निर्णय माणूस घेऊ शकतो.

तळाकडून वर वाहणाऱ्या मेंदूतील लहरी सतत चालू असतात. त्यानुसार पूर्वस्मृती, बाह्य़ जग यांचे विचार मनात येत असतात. कानावर आवाज पडतो आणि हा कोणाचा/ कशाचा आवाज आहे हे आपण ओळखतो; त्या वेळी खालून वर लहरी वाहत असतात. मनात आपोआप येणारे सारे विचार हा खालून वर जाणाऱ्या लहरींचा परिणाम असतो. मात्र, माणूस वर्तमान क्षणात लक्ष आणतो तेव्हा किंवा एखाद्या विचारावर, शब्दावर लक्ष देतो तेव्हा मेंदूत वरून खाली लहरी वाहू लागतात. ही क्षमता- म्हणजेच लक्ष देण्याचे कौशल्य प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते.

yashwel@gmail.com