– डॉ. यश वेलणकर
अमेरिकेत ध्यानाचा मानसोपचार म्हणून उपयोग २००० सालापासून सुरू झाला. २००२ मध्ये डॉ. सीगल यांनी ‘माइंडफूलनेस-बेस्ड् कॉग्निटिव्ह थेरपी (एमबीसीटी)’ म्हणजे साक्षीध्यानावर आधारित मानसोपचार असे त्यास नाव दिले. या उपचार पद्धतीत प्रत्येक आठवडय़ाला दोन तास एकत्रीकरण, सामूहिक ध्यानसत्र केले जाते. या दोन तासांत श्वास, विचार, संवेदना यांच्या साक्षीध्यानाबरोबरच सजगतापूर्वक स्नायूंचे शिथिलीकरण शिकवले जाते. त्याचप्रमाणे सजगता वाढवणारे काही खेळ आणि चर्चा केल्या जातात. ध्यानाचा अभ्यास ४० मिनिटे रोज घरी करावा, असा गृहपाठ दिला जातो. रोज आपल्या कामातून वेळ काढून तीन मिनिटे दीर्घ श्वसनासाठी दोन-तीन वेळा वेळ काढावा, अवधानपूर्वक जेवण, आंघोळ करावी असे सुचवले जाते.
सजगतेने मनुका खाण्याचे ध्यान करून घेतले जाते. तुम्हीदेखील हा गमतीशीर अभ्यास करून पाहा. एक मनुका घ्यायची, तिचे निरीक्षण करायचे, वास घ्यायचा आणि अवधान ठेवून ती तोंडात ठेवायची. जिभेला होणारा तिचा स्पर्श जाणायचा, नंतर ती सावकाश चावायची आणि तिची चव जिभेच्या कोणत्या भागावर सर्वाधिक जाणवते ते समजून घ्यायचे. चावल्यानंतर त्या चवीमध्ये फरक होतो का, हे पाहायचे. नंतर ती गिळायची. त्या वेळी तिचा कुठे कुठे स्पर्श होतो हे लक्ष देऊन पाहायचे. एक झाली की दुसरी, अशी पाच मिनिटे सावकाश, सजगतेने मनुका खाण्याचा सराव करायचा.
काही जणांना ही कृती हास्यास्पद वाटेल, पण या ध्यानाचा उपयोग विचारांचा कल्लोळ कमी करण्यासाठी होतो. बऱ्याचदा आपण काहीही खात असताना मनात विचार चालू असतात. चवीकडे आपले लक्षच नसते. या सरावाने कृती अधिक सजगतेने करणे शक्य होते. संगणकात एकाच वेळी अनेक फाइल्स सुरू असतील तर त्याचा वेग मंदावतो, बंद होतो. मग त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही फाइल्स बंद कराव्या लागतात. आपल्या मेंदूतील विचार म्हणजे एक एक फाइल; एकाच वेळी अनेक विचारांचा कल्लोळ मेंदूलाही थकवतो. त्याला अधूनमधून थोडा वेळ विश्रांती देण्यासाठी मेंदूतील काही फाइल्स बंद करता यायला हव्यात. सजगतापूर्वक कृती केल्याने हेच साधते. त्यासाठी कोणताही मानसिक त्रास नसला तरीही कृतीवर, स्पर्शावर, चवीवर अवधान ठेवण्याचा असा सराव सर्वानीच करायला हवा.
yashwel@gmail.com