– डॉ. यश वेलणकर

गौतम बुद्ध, पतंजली यांनी ध्यान शिकण्यापूर्वी यम, नियम किंवा पंचशील पालन करून वर्तनबदल करण्यास सांगितले होते. परंतु महेश योगी यांनी अमेरिकेत यम-नियम न शिकवता भावातीत ध्यान शिकवण्यास सुरुवात केली, त्या वेळी त्यांच्यावर योगतज्ज्ञांनी याच मुद्दय़ावरून टीका केली. सत्त्वावजय किंवा ध्यानाधारित अन्य मानसोपचारांत ध्यान शिकवले जाते त्या वेळीही अशी टीका होते. आवश्यकता असेल तर आसने आणि प्राणायाम यांचा उपयोग मानसोपचारात करून घेतला जातोच; पण यम-नियम किंवा शीलपालन याविषयीची फार माहिती सांगितली जात नाही. व्यावहारिक आयुष्यात त्यांचे पालन करणे कठीण आहे, असा सर्वसाधारण समज असतो आणि यांचे पालन झाले नाही तर प्रगती होणार नाही अशा विचारांनी माणसे या मार्गाकडेच दुर्लक्ष करतात. मात्र, ‘ध्यान म्हणजे लक्ष देण्याचे कौशल्य’ अशी मांडणी केली की माणसे सराव करण्यास तयार होतात.

मनात कामक्रोधाचे विचार असतील, तर वर्तमान क्षणात लक्ष देणे पूर्वी खूप कठीण होते. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीने ते सोपे झाले आहे. ध्वनिमुद्रण ऐकून सराव करताना विचलित झालेले मन पुन्हा वर्तमान क्षणात आणणे सहज शक्य होते; त्यामुळे सुरुवात शीलपालन किंवा यम-नियमांनी न करतादेखील ध्यानाचा सराव शक्य होतो. ध्वनिमुद्रणामधील सूचना या चालायला शिकताना पांगुळगाडा वापरतात तशा असतात. तोल सावरता येऊ लागला की पांगुळगाडा बाजूला ठेवावा लागतो; तसेच आपले मन भरकटले आहे हे सूचना न ऐकतादेखील लक्षात येऊ लागले, की ध्वनिमुद्रण न ऐकता ध्यानाचा सराव अपेक्षित असतो. असा सराव करू लागल्यानंतर यम-नियमाचे महत्त्व जाणवते. मनात हिंसेचे, वासनांचे विचार असतील तर लक्ष वर्तमान क्षणात राहात नाही हे उमजते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह यांचे पालन न केल्याने आणि मादक पदार्थाचे सेवन यामुळे सजगता धोक्यात येते याचा अनुभव आला, की माणसे वर्तन बदलण्यास प्रवृत्त होतात.

कसे वागावे याचा आयुर्वेदात उपदेश आहे, त्यास ‘आचार रसायन’ म्हणतात. मात्र ध्यानाचा सराव नसेल तर हा सारा उपदेश अव्यवहार्य वाटतो; म्हणून आजच्या काळात सुरुवातीलाच पंचशील, यम-नियम किंवा आचार रसायन यांचा आग्रह न धरता लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करणे शिकवता येते. तरुण-तरुणींमध्ये वाढणारे मानसिक त्रास टाळण्यासाठी त्यांना ध्यानाकडे आकृष्ट करायचे असेल, तर हाच मार्ग परिणामकारक आहे!

yashwel@gmail.com