– डॉ. यश वेलणकर
मेंदूविज्ञान विकसित झाल्यानंतर ध्यानाचे परिणाम समजू लागले आणि त्याचा उपयोग शिक्षण व आरोग्य क्षेत्रात होऊ लागला. आपल्या देशात असा उपयोग अद्याप कमी प्रमाणातच होतो. ध्यानाचा शोध भारतीयांनी लावला असला, तरी आपल्या मनात ध्यानाविषयी गैरसमजुतीच अधिक आहेत. ध्यानाशी जोडली गेलेली गूढता दूर करून; ‘‘लक्ष कुठे आणि कसे द्यायचे याचे कौशल्य म्हणजे ध्यान’’ हे आपण मान्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते ‘पहाटे, पवित्र ठिकाणीच’ करायला हवे वगैरे बंधने ठेवण्याची आवश्यकता नाही. मन भरकटले आहे हे लक्षात आले की ते वर्तमान क्षणात आणणे, हे ध्यान दिवसभरात अधिकाधिक वेळा आणि कुठेही करू शकतो. पालक हे कौशल्य आत्मसात करून मुलांना शिकवू शकतात.
आपल्या समाजात भावनांविषयी कमी गप्पा मारल्या जातात. भावना नैसर्गिक आहेत, त्यांना महत्त्व कशासाठी द्यायचे असा गैरसमज अनेक डॉक्टरांचादेखील असतो. पण भावना अनेक शारीरिक आजारांचे, बेभान कृतींचेही कारण असतात. त्यांना मेंदूचा ताबा घेऊ द्यायचा नसेल तर त्यांच्याकडेही ‘ध्यान’ देणे, त्यांच्यामुळे शरीरात होणारे बदल जाणणे आणि स्वीकारणे ही कौशल्येदेखील प्रत्येक कुटुंबात शिकवली जायला हवीत. पालक मुलांना दात घासायचे, अंघोळ करायचे शिकवतात; तसेच भावनांना कसे सामोरे जायचे, हेही ते स्वत: आचरणात आणून मुलांना शिकवू शकतात. पौगंडावस्थेतील नैसर्गिक सैराट वागणे आटोक्यात ठेवण्यासाठी अगदी लहानपणापासून मुलांशी ध्यान, एकाग्रता, समग्रता, भावना यांविषयी गप्पा मारायला हव्यात. ध्यानामुळे आत्मभान विकसित होते. व्यक्तिमत्त्व विकासातील पहिली पायरी आत्मभान असते. स्वत:मध्ये कोणते गुण-दोष आहेत याची जाणीव झाली तरच स्वत:च्या विकासाची दिशा ठरवता येते.
आत्मभान विकासासाठी स्वत:च्या देहाचे भानदेखील आवश्यक असते. शरीराचे अवयव कुठे आहेत हे मेंदू जाणत असतो. त्याचमुळे अंधारात जेवतानाही आपला घास बरोबर तोंडातच जातो. डोळे बंद करूनही माणूस त्याच्या पायाच्या अंगठय़ाला अचूक स्पर्श करू शकतो. लहान मुले असे खेळ खेळतात; मात्र मोठे झाल्यानंतर माहितीच्या जंजाळात माणूस एवढा गुंगून जातो की मेंदूतील हे इंद्रिय दुर्लक्षित राहते. डोळ्यांनी न पाहता बसल्याबसल्या आपले हातपाय, मान कुठे आहे याकडे लक्ष देणे हेही ध्यान आहे. ध्यानाविषयीच्या पूर्वसमजुती बदलणे हा ‘मनोवेध’मधील लेखनाचा एक उद्देश होता, मिळालेल्या प्रतिसादावरून तो थोडय़ाफार प्रमाणात साध्य झाला आहे असे वाटते.
yashwel@gmail.com