– डॉ. यश वेलणकर
अमेरिकन हार्ट असोसिएशन सर्व हृदयरोग्यांना रोज पाच-सहा वेळा मोठय़ाने हसण्याचा सल्ला देते. असे हसल्याने शरीरात अनेक चांगले परिणाम होतात असे संशोधनात दिसत आहे. माणूस हसतो तेव्हा मेंदूत ‘एण्डोर्फिन’ पाझरते. ‘नायट्रिक ऑक्साइड’ हे रसायन रक्तातून संपूर्ण शरीरात जाते. हे रसायन रक्तवाहिन्यांची आतील भिंत निरोगी ठेवते. तेथे कोलेस्टेरॉलचे थर साचू देत नाही. श्वासाची गती वाढवणाऱ्या कोणत्याही शारीरिक व्यायामांनी जे साधते तेच जोरात हसल्यानेही होते. मोठय़ाने हसल्यानेही कॅलरीज् वापरल्या जातात. त्यामुळे रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढते, धोकादायक कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तातील ‘नॅचरल किलर सेल’ म्हणजे जंतूंना मारणाऱ्या पांढऱ्या पेशी वाढतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
मानसिक तणावामुळे शरीरात युद्धस्थिती असते, त्या वेळी ‘कॉर्टिसॉल’ हे रसायन पाझरत असते. हसल्यामुळे भावना बदलल्याने हे रसायन कमी होते, शरीर-मन युद्धस्थितीत न राहता शांतता स्थितीत येते. रक्तदाब सामान्य होतो, रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो. लहान मुले हसतात तसे मोठय़ाने खदखदून हसणे काही माणसे विसरूनच गेलेली असतात. मनमोकळे हसण्याची सवय त्यांनी स्वत:ला लावून घेतली तर त्यांचे आरोग्याचे अनेक प्रश्न दूर होऊ शकतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्टॅण्डअप कॉमेडीचे कार्यक्रम करून त्याचा परिणाम काय होतो, यावर सध्या संशोधन होत आहे.
परंतु हास्य हे नेहमी निर्मळ असते असे नाही. चित्रपटांत खलनायक त्यांची कुटिल कारस्थाने सफल होतात तेव्हा मोठय़ाने गडगडाटी हसतात, हे आपण पाहतो. प्रत्यक्षात अनेक गुन्हे केलेले सायकोपॅथदेखील असे सतत मोठय़ाने हसले तर निरोगी राहतात का, याचे संशोधन मेंदूतज्ज्ञ करीत आहेत. अशा गुन्हेगारांच्या मेंदूचे परीक्षण केले असता, त्यांच्या मेंदूतच काही विकृती असतात असे दिसत आहे. मेंदूतील समानुभूतीशी निगडित ‘इन्सुला’ हा भाग त्यांच्या मेंदूत अविकसित असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या भावना त्यांना समजतच नाहीत. हाच ‘इन्सुला’ स्वशरीरातील संवेदना जाणण्याचेही काम करीत असतो. तो अविकसित असल्याने त्यांना स्वत:च्या शरीरात काय होते आहे याचे, अर्थात तणावाचेही भान नसते. क्रूर हास्यासोबत विघातक भावना असल्याने हास्याचे फायदे त्यांना होत नाहीत. ‘सर्वाचे भले होवो’ असा भाव मनात धरून हसले तरच त्याचा लाभ होतो.
yashwel@gmail.com