श्रुती पानसे
माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे भाषेची गरज आपल्याला असतेच. पृथ्वीच्या पाठीवर जिथे मानवसमूह आहे, तिथे त्यांनी आपापली बोली घडवली आहे. माणसांना भाषणातून, लेखनातून, कवितेतून, कथांमधून, वात्रटिकांमधून आणि आता सोशल मीडियावरच्या पोस्टवरून अनेक प्रकारे भाषेतून व्यक्त व्हायचं असतं.
आपण भाषा अनेक प्रकारे वापरतो. बोलणं, जाणीवपूर्वक संवाद साधणं, वर्णन करणं, चर्चा करणं, वादविवादात आपला मुद्दा पटवून देणं, मध्यस्थी करून आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करणं. समजावून सांगणं, शास्त्रीय, ललित, विनोदी, समीक्षात्मक अशा विविध प्रकारांपैकी अनेक किंवा एका प्रकारे लेखन करणं. शब्दकोडी करणं. सोडवणं. जाहिरात तयार करणं. बोलण्याचा वापर करून विक्री करणं, मुलाखत घेणं. लिहिणं. एकापेक्षा अनेक भाषा शिकणं. त्या भाषांमध्ये व्यवहार करणं. लेखन करणं. वाचन करणं. या आणि यापेक्षाही कितीतरी प्रकारे भाषा वापरली जाते.
सर्व वेळेला आपण हवी तशी भाषा वळवतो, वाकवतो. प्रत्येक वेळी शैली बदलतो. काही जण केवळ जीवनव्यवहारासाठी बोलतात, गरजेपुरतंच वाचतात. पण काही माणसांना भाषा वापरायला चांगलं जमतं, त्यांच्याकडे भाषिक बुद्धिमत्ता आहे असं आपण म्हणू शकतो. यापैकी कोणतीही गोष्ट करायला आवडत असेल तर त्या माणसामध्ये भाषिक बुद्धिमत्ता असू शकते. (लिंग्विस्टिक- व्हर्बल इंटलिजन्स) . या बुद्धिमत्तेचा संबंध मेंदूतल्या ब्रोकाज एरिया या क्षेत्राशी आहे. या क्षेत्रात न्युरॉन्सच्या जोडण्या इतर क्षेत्रांपेक्षा वेगात तयार होतात.
वाचनाची आवड जोपासण्यासाठी विशेष परिश्रम करून वाचनालयांची वर्गणी भरली जाते किंवा पुस्तकं वाचण्यासाठी विकत आणली जातात, आवर्जून वाचली जातात, पुस्तकांविषयी बोललं जातं, तेव्हा ही बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते. आज जी माणसं शिक्षक आहेत किंवा लेखक, पत्रकार, पटकथाकार, कवी, निवेदक, वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत त्या सर्व माणसांमध्ये ही बुद्धिमत्ता असते.शिक्षकांना कोणताही विषय शिकवायचा असेल तरी भाषा यावीच लागते. विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या लोकांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. भाषेशी खेळणं या व्यक्तींना आवडतं. शब्दांशी खेळणं, विविध शब्दांचा विचार करणं, अगदी शब्दच्छल करणं हेसुद्धा!
contact@shrutipanse.com