– डॉ. यश वेलणकर

पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, हा प्रश्न सोडवण्यासाठी आता त्याच्या वंशाला जाण्याची गरज नाही. मेंदू संशोधनात हे समजले आहे की, मासा, सरडे, पक्षी यांचा अर्धाच मेंदू एका वेळी झोपतो. त्याची विश्रांती पूर्ण झाली, की तो काम करू लागतो; मग दुसरा अर्धा भाग झोपतो. अर्धा मेंदू जागा राहिल्याने त्यांना परिसराचे ज्ञान होत राहते. धोका जाणवला की, ते स्वत:चा बचाव करू शकतात. सस्तन प्राण्यांत मात्र असे होत नाही. झोपलेल्या प्राण्यांना परिसराचे भान राहत नाही. मात्र गाढ झोपेतही सस्तन प्राण्यांच्या मेंदूचा काही भाग जागृत असतो. माणसाचा मेंदूही झोपेच्या काळात कधीच पूर्णत: त्याचे काम थांबवीत नाही. त्याचा जैविक मेंदू सतत काम करीत असतोच. त्यामुळेच श्वासोच्छवास, हृदयाचे काम, अन्नपचन, जंतूंना प्रतिकार ही कामे झोपेतही चालू राहतात.

स्नायूंची हालचाल नियंत्रित करणारा मेंदूचा भाग झोपेत विश्रांती घेतो; पण त्यामध्येही एक महत्त्वाची गोष्ट शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आहे. जागे असताना ज्या स्नायूंची हालचाल अधिक होते, त्या स्नायूंना नियंत्रित करणारा मेंदूचा भाग झोपेत विश्रांती घेतो. शारीरिक कष्ट करणारी माणसे पटकन गाढ झोपी जातात याचे हे एक कारण आहे. याउलट दिवसभर खुर्चीत बसून काम करणाऱ्या माणसांनी त्यांच्या सर्व स्नायूंना दिवसभरात कधीच काम दिले नाही, तर रात्री झोपेतही मेंदूतील स्नायूंना नियंत्रित करणारा बराचसा भाग जागा राहतो. त्यामुळे त्या माणसांना आपल्याला शांत झोप लागत नाही असे वाटत राहते.

शांत झोप हवी तर जागे असताना सजगतेने पायाच्या अंगठय़ापासून मानेपर्यंत जेथे जेथे हालचाली शक्य आहेत त्या करायला हव्यात. पाठीच्या कण्याला पीळ द्यायला हवा; मानेच्या जेवढय़ा हालचाली होतील, त्या करायला हव्यात. शरीराचे सारे स्नायू दोन-तीन तासांनी ताणायला हवेत. माणसाच्या मेंदूला झोपेत परिसराचे भान नसले तरी संकटाची जाण असते. त्यामुळेच ठरावीक तीव्रतेपेक्षा मोठा आवाज झाला की, काही तरी धोका आहे हे जाणून तो विश्रांती बंद करतो. गजराचा आवाज ऐकून माणूस खडबडून जागा होतो. मात्र रोज असे गजर लावून उठणे खरे म्हणजे त्रासदायक आहे. त्या वेळी काही तरी धोका आहे असे मेंदूला वाटते आणि दिवसाची सुरुवातच युद्धस्थितीमध्ये होते. झोपताना कधी जागे व्हायचे याच्या सजगतेने स्वयंसूचना घेतल्या, की शांततास्थितीत जाग येऊ लागते.

yashwel@gmail.com