– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पौगंडावस्था म्हणजे बाल्य व तारुण्य यांमधील काळ. या वेळी शरीरात आणि मेंदूत अनेक बदल होत असतात. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेमध्येही बदल होतात. ती मित्रमंडळींत अधिक रमू लागतात. साहसाची आवड निर्माण होते. मित्रमंडळींत वाहवा होण्यासाठी कोणतीही आव्हाने स्वीकारली जातात. याच वेळी शरीरात लैंगिक संप्रेरकेही तयार होतात. त्यामुळे भिन्नलिंगी व्यक्तींविषयी आकर्षण वाढू लागते. मनात लैंगिकतेचे विचार येऊ लागतात. त्यामुळे स्वत:च्या मनातील भावना ओळखणे, ती योग्य प्रकारे कशी व्यक्त करायची हे ठरवणे, ही कौशल्ये याच वयात मुलांना शिकवायला हवीत.

काहींना मनातील लैंगिक विचारांमुळे स्वत:ची घृणा वाटू लागते. उत्सुकता शमवण्यासाठी काही जण इंटरनेटचा आधार घेतात. उत्सुकता म्हणून स्मार्ट फोनवर पाहिलेली दृक्मुद्रणे वारंवार पाहावीत असे वाटू लागते आणि ‘पोर्न’चे व्यसन लागते.

हे व्यसन खूप घातक आहे, कारण त्याचेच विचार मनात ठाण मांडून राहतात. मेंदूत कोणतीही भावना असते, तेव्हा ती फाइल सर्वात प्रबळ असते. राग, भीती या भावना बालवयातही असतात, मात्र लैंगिक वासना ही भावना पौगंडावस्थेतच अधिक जाणवू लागते. हे विचार मनात येतात तेव्हा मेंदूतील ‘अमीग्डला’ही अधिक सक्रिय होतो. भय, लज्जा या नैसर्गिक भावनाही याच ‘अमीग्डला’मधून निर्माण होतात; पण वासना प्रज्वलित झाली की या अन्य भावनांशी संबंधित मेंदूतील फाइल्स प्रबळ राहत नाहीत. वासनेची फाइल सर्वात प्रभावी होते आणि त्या वेळी सैराट कृती होते. हे विचार मनात सतत राहिल्याने एकाग्रता आणि ग्रहणशीलता कमी होते. त्याचा दुष्परिणाम अभ्यासावर होऊ लागतो. प्रेम आणि शारीरिक आकर्षण या दोन वेगळ्या भावना आहेत. लैंगिक आकर्षण वंशसातत्य राखण्यासाठी निर्माण झालेली आदिम भावना आहे.

मेंदूमध्ये हा फरक पाहण्यासाठी स्वयंसेवकांना लैंगिक उत्तेजना देणारी चित्रे, तसेच त्यांच्या प्रिय व्यक्तींचीही छायाचित्रे दाखवली. या दोन्ही वेळी मेंदूतील सक्रिय होणारे अन्य भाग सारखेच असले, तरी ‘इन्सुला’मध्ये फरक दिसून आला. लैंगिक उत्तेजना असते तेव्हा या भागाचा भावनिक मेंदूच्या बाजूचा भाग सक्रिय झाला. प्रेम या भावनेच्या वेळी मात्र या अवयवाचा पुढील भाग अधिक सक्रिय झाला. पौगंडावस्थेतील मुले या दोन भावनांमधील फरक जाणू लागली, तर त्यांच्याकडून होणाऱ्या चुका ती टाळू शकतील.

yashwel@gmail.com