डॉ. मानसी राजाध्यक्ष
साऱ्या विश्वामध्ये सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा आणि सर्वात हलका वायू ! एवढेच नव्हे, तर पाण्याने व्यापलेल्या आपल्या पृथ्वी या ग्रहावरच्या, पाण्यामधल्या दोन घटकांपैकी एक घटक असणारे मूलद्रव्य !! अनेक रासायनिक प्रक्रियांमधून आपले अस्तित्व दाखवणारा हा वायू दीर्घ काळ रसायनतज्ज्ञांना चकवा देत होता. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला, परिसाच्या शोधात असलेल्या पॅरॅसेल्सस या स्वीस वैद्यकतज्ज्ञाने अजाणतेपणी हा वायू आपल्या प्रयोगशाळेत तयार केला. काही धातूंबरोबर तीव्र आम्लांची क्रिया करताना हा ज्लवनशील वायू तयार होतो, एवढेच त्याने नमूद केले.
इ.स. १६७१ मध्ये आयरिश संशोधक रॉबर्ट बॉयलनेही लोखंडाच्या भुकटीवर आम्लाची क्रिया करून अशाच प्रकारच्या ‘जळणाऱ्या हवे’ची निर्मिती केली. ही ‘जळणारी हवा’ म्हणजे एखादा ज्वलनशील खनिज वायू असल्याचा प्रथम समज झाला. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘फ्लॉजिस्टॉन’ सिद्धांत मांडला गेला होता. या सिद्धांतानुसार काही पदार्थामध्ये फ्लॉजिस्टॉन हा पदार्थ असतो आणि असे पदार्थ जळताना हा फ्लॉजिस्टॉन त्यातून बाहेर पडतो. धातूंवर होणाऱ्या आम्लाच्या क्रियेत निर्माण होणारी ही ‘जळणारी हवा’ म्हणजे खुद्द फ्लॉजिस्टॉनच असल्याची शक्यता व्यक्त केली गेली. रॉबर्ट बॉयलने आपल्या या प्रयोगाचा पाठपुरावा मात्र केला नाही. त्यानंतर थोडथोडकी नव्हे तर जवळजवळ शंभर वर्षे गेली आणि अखेरीस या ‘हवे’ची पुन्हा दखल घेतली गेली.
इ.स. १७६६ मध्ये इंग्लिश संशोधक हेन्री कॅव्हेंडिश याने आम्लाच्या जस्तावरील क्रियेद्वारे याच ‘जळणाऱ्या हवे’ची निर्मिती केली. या ज्वलनशील वायूचे गुणधर्म इतर ज्वलनशील वायूंपेक्षा वेगळे असल्याचे तसेच त्याची घनतासुद्धा या इतर वायूंपेक्षा कमी असल्याचे कॅव्हेंडिशने दाखवून दिले. पण त्याचबरोबर, याच्या निर्मितीसाठी कोणताही धातू किंवा कोणतेही आम्ल वापरले, तरी त्यातून निर्माण होणारा हा वायू एकच असल्याचे दाखवून कॅव्हेंडिशने या वायूला स्वतंत्र अस्तित्व दिले. या वायूच्या रासायनिक क्रिया अभ्यासून हेन्री कॅव्हेंडिशने हा वायू जाळल्यावर पाणी तयार होत असल्याचेही सिद्ध केले. अशा प्रकारे या वायूचा ‘अधिकृतरीत्या’ शोध लागला ! त्यानंतर पंधरा वर्षांनी फ्रेंच रसायनतज्ज्ञ आन्त्वान लव्हॉयजे याने ‘हायड्रो’ (म्हणजे पाणी) आणि ‘जेनीस्’ ( म्हणजे निर्माण करणारा ) या ग्रीक भाषेतील शब्दांचा संदर्भ घेत या मूलद्रव्याचे बारसे केले – हायड्रोजन!
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org