डॉ. यश वेलणकर
योग, आयुर्वेद यांमध्ये माणसाच्या अंतरविश्वाला ‘अंतकरण’ असे नाव दिलेले आहे. त्याचे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे चार भाग आहेत. माणसाला बाह्य़ जगाचे ज्ञान ज्ञानेंद्रिये करून देत असली, तरी तेथे मन नसेल तर ते ज्ञान होत नाही. इंग्रजीत ‘अटेन्शन’ या शब्दाने जे सांगितले जाते, ते मनाचे एक कार्य आहे. मन विचारात असले तर शरीराला होणाऱ्या स्पर्शाचे ज्ञान होत नाही. ते तळहात, तळपायांवर नेले की, तेथे स्पर्श जाणवू लागतो.
जे काही जाणवते आहे त्याचा अर्थ लावणे, हे बुद्धीचे कार्य आहे. कानावर आवाज पडल्यानंतर हा आवाज एखाद्या गाडीचा किंवा पक्ष्याचा आहे, हे ओळखते ती बुद्धी. प्रत्येक इंद्रियाची वेगळी बुद्धी आहे, असे चरकाचार्य यांनी सांगितले आहे.
मन आणि बुद्धी यांचा एकत्रित परिणाम म्हणून विचार निर्माण होतात. आवाज ऐकू आल्यानंतर हा एखाद्या माणसाचा आवाज आहे, हे आपण ओळखतो म्हणजे तो विचार येतो. असे असंख्य विचार येत असतात, काही वेळा ते परस्परविरोधीदेखील असतात. त्यामुळे मनाचे संकल्प-विकल्पात्मक मन असेही वर्णन केलेले आहे. करावे की करू नये, अशा संभ्रमात पडणे ही केवळ अर्जुनाची किंवा हॅम्लेटची अवस्था असते असे नाही. प्रत्येक माणसाच्या मनाचे ते स्वाभाविक लक्षण आहे. आत्ता हे हे विचार आहेत, हे माणसाचे मन जाणू शकते; म्हणून ते ज्ञानेंद्रिय आहे आणि ते कर्मही करते म्हणून त्याला उभयात्मक इंद्रिय म्हटले आहे.
परस्परविरोधी विचारांतील कोणता विचार कृतीत आणायचा, हे जी बुद्धी ठरवते, तिला विवेकबुद्धी म्हणतात. असा निर्णय घेणे हे बुद्धीचे कार्य आहे, त्यामुळे निश्चयात्मक बुद्धी असे तिचे वर्णन केले जाते.
अंतकरणाचे तिसरे अंग म्हणजे अहंकार होय. मन आणि बुद्धीप्रमाणेच अहंकार असणे स्वाभाविक आहे. मी- इंग्रजीत ‘सेल्फ’ हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. गर्व हा अर्थ येथे नाही. ‘अहं करोति’ इति अहंकार. मी हे खातो, मला हे आवडते, हे जमते, हे करता येत नाही- हा भाव म्हणजे अहंकार होय. हा अहंकार म्हणजे स्मृतींचे गाठोडे असते. आणि चित्त म्हणजे स्मृतीचे गाठोडे बाजूला ठेवून घेतलेला अनुभव होय.
साक्षीध्यान म्हणजे अंतकरणातील या चार भागांचा अनुभव घेणे होय!
yashwel@gmail.com