डॉ. मानसी राजाध्यक्ष
इसवीसन १६४०! जान बाप्टिस्ट व्हान हेलमोंट या बेल्जियन रसायनतज्ज्ञाने एक साधा प्रयोग केला. त्याने सुमारे तीस किलोग्रॅम कोळसा जाळला आणि त्यानंतर त्यातून मिळालेल्या राखेचे वजन केले. ते फक्त अर्धा किलो भरले. वजनातल्या या घटीवरून त्याने निष्कर्ष काढला- कोळसा जळताना, त्यातून एखादा हवेसारखा, न दिसणारा पदार्थ बाहेर पडत असावा. या अदृश्य पदार्थाला व्हान हेलमोंटने नाव दिले ‘वूडगॅस’ म्हणजे लाकडातला वायू. मात्र या प्रयोगानंतर लाकडातल्या या वायूवरील संशोधनाला स्वल्पविराम मिळाला.
सुमारे शतकभराच्या स्वल्पविरामानंतर १७५० सालच्या आसपास या संशोधनाला पुन्हा गती मिळाली. स्कॉटलंडच्या जोसेफ ब्लॅक या वैद्यकतज्ज्ञाने अल्कधर्मीय पदार्थावरील काही संशोधन सुरू केले होते. चुनखडीप्रमाणेच (कॅल्शियम काबरेनेट), मॅग्नेशियम अलबा (मॅग्नेशियम काबरेनेट) या पदार्थावरही आम्लाची क्रिया करताना, कोणता तरी एखादा वायू तयार होऊन बुडबुडे येतात, हे त्याने जाणले. त्यानंतर त्याने मॅग्नेशियम अलबाला तापवले. त्यामुळे मॅग्नेशियम अलबाचे रूपांतर मॅग्नेशियम उस्टा (मॅग्नेशियम ऑक्साइड) या पदार्थात झाले. मॅग्नेशियम उस्टा आम्लाच्या संपर्कात आल्यास मात्र कोणताच वायू निर्माण होत नसल्याचे त्याला आढळले. दोन्ही पदार्थाच्या वजनातील फरकावरून, मॅग्नेशियम अलबाने एखादा अज्ञात वायू पकडून ठेवला असल्याचा निष्कर्ष जोसेफ ब्लॅकने काढला आणि या वायूला त्याने ‘पकडून ठेवलेली हवा’ असे म्हटले. हे त्याचे संशोधन १७५६ साली फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ एडिन्बर्गने प्रकाशित केले.
आज कार्बन डायऑक्साइड म्हणून ज्ञात असलेल्या या वायूचा, अशा प्रकारे शोध लावताना जोसेफ ब्लॅकने या वायूचे वेगळेपण सिद्ध केले. यासाठी जोसेफ ब्लॅकने काढलेले निष्कर्ष म्हणजे, हा वायू हवेपेक्षा जड आहे. तसेच हा वायू ज्वलनाला किंवा प्राण्यांच्या श्वसनाला अजिबात मदत करीत नाही. मात्र प्राण्यांच्या श्वसनाद्वारे आणि अन्न आंबण्याच्या क्रियेमधून प्रामुख्याने हाच वायू बाहेर पडतो, हेही त्याने दाखवून दिले. हा वायू चुन्याच्या निवळीतून जाऊ दिला तर, ती निवळी पांढुरकी होते. (हा पांढुरका पदार्थ म्हणजे चुनखडी.) ‘प्रत्येक वायू म्हणजे वातावरणातली हवाच असते असे नव्हे, तर तो एक स्वतंत्र रासायनिक पदार्थ असू शकतो’ हे कार्बन डायऑक्साइडच्या शोधावरून नक्की झाले.
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org