– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामक्रोधादी मानसिक विकार दूर करण्यासाठी शरीराकडे लक्ष नेणे आवश्यक आहे, हे आपल्या पूर्वजांना समजलेले होते. बुद्धाची विपश्यना म्हणजे शरीरातील संवेदना साक्षीभावाने जाणण्याचेच ध्यान आहे. अन्य प्राचीन विद्यांमध्येदेखील शरीराकडे लक्ष देण्यासाठी विविध उपाय सांगितलेले आहेत. जैन संप्रदायात ‘प्रेक्षाध्यान’ आहे, योगासने हा शरीराकडे लक्ष नेण्याचाच एक उपाय आहे. योगमार्गात सांगितलेली चक्रे ही शरीरातच असतात, त्यांच्यावर ध्यान करताना शरीरावर लक्ष नेणे अपेक्षित असते.

आयुर्वेदात त्रासदायक भावनांना ‘धारणीय वेग’ म्हटले आहे. वेग म्हणजे शरीरात जाणवणारे बदल असतात. मल-मूत्र विसर्जन, तहान, भूक हेदेखील वेग आहेत; त्यांचे धारण करायचे नाही. भावना यादेखील वेग आहेत, त्या वेगानुसार लगेच कृती करायची नाही. त्या वेळी शरीरात बदल होतात. याचा अनुभव येण्यासाठी मन अस्वस्थ असेल तेव्हा शरीराकडे लक्ष नेण्याचा सराव करायला हवा. असा सराव प्राचीनकाळी ‘प्रभाते कर दर्शनम्’ म्हणत जागे झाल्यापासून सुरू केला जात असे. मुस्लीमधर्मीय रोजे पाळताना तकवा म्हणजे आवंढा न गिळण्याचा सराव करतात. हाही शरीराकडे सजगतेने लक्ष देण्याचा मार्ग आहे.

अ‍ॅक्युपंक्चर, अ‍ॅक्युप्रेशर, ताई-ची अशा तंत्रातही शरीराकडे लक्ष नेले जाते. मसाज करून घेत असतानाही शरीराकडे लक्ष दिले जाते. आघातोत्तर तणाव असलेल्या व्यक्तींना मात्र मसाज करून घेतानाही शरीराच्या कोणत्या भागावर दाब पडतो आहे हे डोळे बंद केले तर नीटसे समजत नाही. त्रासदायक भावनिक स्मृतींच्या वेळी शरीरात तीव्र अप्रिय संवेदना निर्माण होतात. त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी शरीराची माहिती घेणारा त्यांच्या मेंदूतील भाग बधिर झालेला असतो. पण त्यामुळे अनेक शारीरिक सुखांचा उत्कट अनुभव त्यांना मिळत नाही. अशी माणसे जैविक आणि भावनिक मेंदूच्या वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे एक तर सतत युद्धस्थितीत असतात, अनामिक संकट येईल अशा विचारांमुळे चिंतेमध्ये असतात किंवा मेंदूतील संवेदना जाणणारा भाग बधिर झाल्याने उदास राहतात. मेंदूच्या संशोधनात आढळलेले हे सत्य आयुर्वेद आणि योगातील प्राचीन तज्ज्ञांनी ‘वाढलेला रजोगुण आणि तमोगुण’ अशा स्वरूपात वर्णन केले आहे. सत्त्वावजय चिकित्सेत त्यावर केल्या जाणाऱ्या उपायांनी मेंदूची अतिसंवेदनशीलता किंवा बाधीर्य दूर होते.

yashwel@gmail.com