– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालायला- बोलायला शिकायच्या वयात तसे करणारी माणसे दिसली नाहीत तर माणूस ते करू शकत नाही हे जगभरातील प्राण्यांच्या सहवासात राहिलेल्या शंभर बाळांच्या उदाहरणातून दिसले होते. याचाच अर्थ माणसाचे बाळ अधिकाधिक गोष्टी अनुकरण करत शिकत असते. अशी बालके हसत नाहीत कारण हास्य त्यांनी पाहिलेलेच नसते. याचाच अर्थ भावना कशा व्यक्त करायच्या याचे प्रशिक्षणदेखील अनुकरणातून होत असते. म्हणून लहान मुलांसमोर कसे वागायचे याचे भान मोठय़ा माणसांनी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. बाळाला रडायला शिकवावे लागत नाही, पण हसायला शिकवावे लागते. अगदी लहान बालके झोपेतदेखील हसतात, पण ते हास्य टिकून राहण्यासाठी आजूबाजूला हसणारी माणसे दिसत राहावी लागतात. हे लक्षात घेतले की भावना कशा व्यक्त करायच्या याचे प्रशिक्षण पालकांनी स्वत:च्या उदाहरणातून देणे गरजेचे आहे हे समजते. राग आल्यानंतर आवाज चढवून बोलणे, मनाविरुद्ध झाल्यानंतर किंचाळणे, रडणे हे लहान मुलासमोर टाळायला हवे. त्यासाठी पालकांनी सजग राहणे खूप महत्त्वाचे आहे. लहानपणी कानावर जे शब्द पडतात तीच मातृभाषा आणि तसे हेल माणूस काढू लागतो. तसेच भावना ठरावीक पद्धतीने व्यक्त करणेदेखील तो सवयीने करू लागतो. पहिल्या दोन वर्षांत ज्या बालकांना प्रेम आणि आपलेपणाचा स्पर्श लाभत नाही त्यांच्या मेंदूत ‘समानुभूती’साठी आवश्यक भाग अविकसित राहतो असे मेंदू संशोधनात दिसत आहे. नंतर ध्यानाच्या नियमित सरावाने तो विकसित होत असला तरी मेंदूच्या विकासामध्ये नातेसंबंधाचे महत्त्व संशोधनातून अधोरेखित होत आहे. ‘गवयाची पोर सुरात रडते’ याचे कारण केवळ जनुके हे नसते. तिच्या कानावर जसे सूर पडत राहातात त्याचे अनुकरण ती करू लागते. माणसाचा स्वभाव म्हणजे भावनिक प्रतिक्रिया करण्याची सवयदेखील अनुकरणातून होत असल्याने सजग पालकत्व खूप महत्त्वाचे आहे. महागडय़ा शाळेत केजीपासून प्रवेश घेणे हा आदर्श पालकत्वाचा निकष नाही. स्वत: सजग राहून भावनिक अंध प्रतिक्रिया कमी करणे हे आदर्श पालकत्व आहे. त्यासाठी आईवडिलांनी मुलांसमोर भांडणे शक्यतो टाळायला हवेच पण भांडण झाले तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याचे उदाहरणदेखील समोर ठेवायला हवे.

yashwel@gmail.com