– डॉ. यश वेलणकर
मानसिक तणावाचा परिणाम म्हणून शरीरात काही लक्षणे दिसतात त्याला रूपांतरण समस्या म्हणतात. मानसिक तणावामुळे उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अर्धशिशी, थायरॉइडचे विकार, त्वचारोग असे अनेक शारीरिक आजार होत असले तरी त्यांना रूपांतरण म्हणत नाहीत. कारण या आजारात शरीरात विकृती आढळते. रक्त तपासणीत ती दिसू शकते. रूपांतर समस्या जिला पूर्वी हिस्टेरिया म्हटले जाई, तीत मात्र शारीरिक तपासणीत कोणतेच दोष आढळत नाहीत. एखाद्या तरुण मुलीला आकडी येते पण मेंदूच्या तपासणीत त्याचे कारण दिसत नाही. कुणाला अचानक दिसायचे बंद होते, पण डोळ्यात कोणतीच विकृती आढळत नाही. कुणाला बोलता येत नाही, पण स्वरयंत्र अविकृत असते. अशावेळी रूपांतरण समस्या असे निदान केले जाते. हा आजार मानसिक असला तरी रुग्ण खोटे बोलत नसतो, नाटक करीत नसतो. त्याला खराखुरा त्रास होत असतो. त्रास शारीरिक असला तरी त्याचे मूळ भावनिक विकृती हे असते. औदासीन्य या आजारात दिली जाणारी औषधे येथे उपयोगी होतात. मात्र आजाराचे कारण दूर करण्यासाठी मानसोपचार आवश्यक असतात. पूर्वी कामभावना दडपून ठेवल्याने हा आजार होतो असे वाटत होते. पण आता राग, चिंता, उदासी या भावना दमन करीत राहिल्यानेदेखील असे होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. विशेषत: लहानपणी काही अत्याचार झाले असतील आणि ते जवळच्या नातेवाइकाने केलेले असतील तर त्याविषयीचा क्रोध, घृणा, लज्जा मनात असते. पण ती व्यक्त करता येत नाही. अशावेळी ती शारीरिक लक्षणात रूपांतरित होते. परस्परविरोधी भावनांचा तीव्र संघर्ष मनात असेल तरीही असे होते. एखाद्याचा सूड घ्यावा असा तीव्र राग येतो, पण त्याचवेळी असे काही कृत्य करणे अनैतिक आहे अशीही तीव्र भावना असेल तर सुटकेचा उपाय म्हणून मेंदू उपाय योजतो आणि त्या व्यक्तीला शरीराची हालचालच करता येत नाही. यावेळी मेंदूची तपासणी केली असता, अर्धाग होतो त्यावेळी दिसून येणारे कोणतेच बदल मेंदूत दिसत नाहीत. पण शरीराचे नियंत्रण करणारा मेंदूचा भाग व मेंदूतील व्यवस्थापक प्री फ्रान्टल कोर्टेक्स यांचा संपर्क दुबळा झाल्याचे पाहायला मिळते. आघातोत्तर तणावातही मेंदूत असे बदल दिसतात. समुपदेशनाने भावनांचा गुंता सोडवणे व शरीराकडे लक्ष देण्याचे साक्षीध्यान यांनी हा आजार बरा होतो.
yashwel@gmail.com