डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
इंग्लिश निसर्गसंशोधक चार्ल्स डार्वनि एच. एम. एस. बीगल या जहाजातून १८३१-१८३६ या काळात जगाच्या सफरीवर गेला होता. या सफरीत त्याच्या जहाजाचा मुक्काम प्रशांत महासागरातील, इक्वेडोरच्या पश्चिमेला असणाऱ्या गॅलॉपॅगोस या बेटांवर होता. या मुक्कामात चार्ल्स डार्वनिने गॅलॉपॅगोस बेटांवरील अनेक प्राणी-पक्ष्यांची निरीक्षणे केली. या निरीक्षणांत त्याला इथे प्राणी-पक्ष्यांच्या अनेक वैशिष्टय़पूर्ण प्रजाती आढळल्या. फिंच या चिमणीसदृश पक्ष्याची त्याची निरीक्षणे तर खूपच वैशिष्टय़पूर्ण ठरली. दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्यावरील फिंच पक्ष्यांच्या चोचीच्या आकारात, रंगात, आकारमानात, अन्नग्रहणाच्या पद्धतीत आणि इथल्या फिंच पक्ष्यांच्या तशाच वैशिष्टय़ांत फरक असल्याचे त्याला आढळले. इतकेच नव्हे तर इथल्या प्रत्येक बेटावरील फिंच पक्ष्यांच्या चोचींचा आकार हासुद्धा त्या त्या ठिकाणच्या अन्नानुसार वेगवेगळा होता. याचा अर्थ इथल्या प्राणी-पक्ष्यांची वैशिष्टय़े इथल्या परिस्थितीशी जुळणारी होती. याच अभ्यासातून चार्ल्स डार्वनिचा ‘नैसíगक निवडी’चा (नॅचरल सिलेक्शन) सिद्धांत जन्माला आला आणि चार्ल्स डार्वनि हा उत्क्रांतीवादाचा जनक ठरला. हा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्याने १८५९ साली आपल्या ‘ऑन दि ओरिजिन ऑफ स्पिशीज..’ या पुस्तकात सविस्तरपणे मांडला.
पुनरुत्पादन हे सजीवांचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक प्रजातीतील सजीव मोठय़ा प्रमाणात संतती निर्माण करीत असतात. या संततीतील प्रत्येकाच्या गुणधर्मात निसर्गत:च किंचितसा फरक असतो. संततीतील सर्वाना आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेऊनच जगावे लागते. या संघर्षांत ज्या संततीचे गुणधर्म परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अनुकूल ठरतात, तीच संतती केवळ टिकून राहते. या टिकून राहिलेल्या संततीचे जे गुणधर्म परिस्थितीला अनुकूल ठरलेले असतात, ते गुणधर्म त्या सजीवाच्या पुढील पिढय़ांत संक्रमित होतात. यातूनच धिम्या गतीने नवीन प्रजाती निर्माण होऊन उत्क्रांती होत जाते. सजीवांच्या होणाऱ्या या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजेच डार्वनिचा उत्क्रांतीचा सिद्धांत. सजीवांची निर्मिती ही उत्क्रांतीतून होत असल्यामुळे, डार्वनिचा हा सिद्धांत मानवाची निर्मितीसुद्धा प्राचीन काळातल्या माकडासारख्या सजीवापासून झाली असल्याचे दर्शवीत होता. उत्क्रांतीचा हा सिद्धांत धर्मग्रंथातील समजुतींच्या विरुद्ध होता. साहजिकच तत्कालीन धर्मगुरूंचा या सिद्धांताला विरोध झाला. परंतु चार्ल्स डार्वनिच्या या नैसर्गिक निवडीच्या ऐतिहासिक सिद्धांतामुळे उत्क्रांतीशास्त्राला वैज्ञानिक बैठक मिळून, वैज्ञानिकांना उत्क्रांतीवादाच्या अभ्यासाचा पुढचा मार्ग सापडला.
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org